Press "Enter" to skip to content

कृषी सचिवांची वदपच्या निली इनपुट्सला भेट


बहुपयोगी यंत्र तयार करण्याचा सल्ला 🔷🔶🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड )🔷🔷🔶🔶

महाराष्ट्राचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सायंकाळी अचानक वदप येथील शेतकरी – शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलिकेश दळवी यांच्या ‘ निली इनपुट्स ‘ ह्या शेती अवजारे बनविणाऱ्या लघु कारखान्याला विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील व अलिबागचे कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्यासह भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यांनी शेतीसाठी बहुपयोगी छोटे यंत्र तयार करण्याचा सल्ला दळवी यांना दिला.

जिल्ह्यातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे ‘ नावीन्यपूर्ण शेतकरी ‘ पुरस्कार मिळविणारे स्व. बाळ दळवी यांचे चिरंजीव अनुक्रमे निलिकेश व नयनिश तसेच भाऊ कैलास दळवी हे दमदारपणे त्यांचा वारसा चालवित आहेत. भात शेती ही कष्टाची, खर्चाची असून मजुरांची वानवा, मजुरीचे वाढते दर लक्षात घेता आतबट्टयाची झाल्याने ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी दळवी कुटुंबीयांनी आपले कौशल्य पणाला लावून विविध किफायतशीर यंत्रांची निर्मिती केली आहे.

त्यात भातशेतीत लावणी न करता सरळ सुधारित ड्रम सीडरने पेरणी केल्यास हेक्टरी 23 मजुरांची बचत होऊन फायदेशीर शेती करता येते. हे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे पावरटिलरला जोडता येणारे व अन्य कंपन्यांच्या यंत्रापेक्षा तुलनेने अधिक पेंढा देणारे ‘ भात कापणी यंत्र’ विकसित करून त्यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे.

ही दोन्ही यंत्रे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून त्याची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट दिल्याचे बोलले जाते.
यावेळी निलिकेश दळवी यांनी स्वतः तयार केलेल्या विविध यंत्रांद्वारे घेतलेल्या प्रात्यक्षिकाच्या क्लिप्स मान्यवरांना संगणकावर दाखविल्या. सदर यंत्राद्वारे भात, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इ. पिकांची कापणी कशी यशस्वीरीत्या करता येते. हे दळवी यांनी पटवून दिले. दळवी यांच्या नावीन्यपूर्ण यंत्रनिर्मितीची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

शेतकऱ्यांना विविध कामांना उदा. पायाने चालविता येणारा पंप , नांगरणी करणे, सरी पाडणे, भर देणे, औषधी फवारणीसाठी उपयोगी पडेल ,जनरेटर लावता येईल, विविध पिकांना उपयोगी पडेल. असे अधिक सोयीचे एकच यंत्र बनविण्याचा सल्ला श्री डवले यांनी दिला. शेतकऱ्यांना अवजारांची गरज असल्याने दळवीनिर्मित यंत्रांना योजनेत सामावून घेण्याबाबतची शिफारस श्री विकास पाटील यांनी श्री डवले यांना केली. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची मान्यता कापणी यंत्राला मिळण्यासाठी पाठपुरावा करू, असे श्री डवले यांनी आश्वस्त केले.

यावेळी निली इनपुट्सचे तंत्रज्ञान सहकारी धनंजय गांगल, शेतकरी ऍड अजित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कृषी सचिवांच्या भेटीने दळवी कुटुंबीय व उपस्थित शेतकरी हरखून गेले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.