सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔷🔶🔶
रा.जि.प शाळा विष्णू नगर (ता.रोहा) येथील विद्यार्थीप्रिय शिक्षिका श्रीमती वनिता चंद्रकांत पवार यांना यावर्षीचा रायगड जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर विद्यार्थ्यांसह अनेक चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोहा तालुक्यात गेली २४ वर्षे अखंडपणे सेवा करणाऱ्या श्रीमती वनिता पवार यांनी आज तगायत शालेय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध हुद्द्यावर नोकरी करत आहेत.
मनमिळावू स्वभाव, विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काही नवीन करण्याची धडपड या त्यांच्या गुणांमुळे त्या विद्यार्थीप्रिय आहेतच पण सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान चांगले आहे. त्यांनी आज तगायत राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शारीरिक क्षमता उंचविण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सातत्याने चालू असतात.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाईसाहेब पाशिलकर हे पित्यासमान असून त्यांच्या चरणी हा मानाचा पुरस्कार अर्पण केल्याचे वनिता पवार यांनी आवर्जून सांगितले. तालुका विज्ञान प्रदर्शन असो किंवा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन असो त्यांचा सहभाग सातत्याने असतो. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना नवीन काही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
विज्ञान प्रदर्शनात त्यांनी तयार केलेल्या शिक्षक प्रतिकृतीस बक्षीसही मिळाले आहेत. गेल्या २४ वर्षांत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना शासनाच्या रायगड जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment