Press "Enter" to skip to content

सुधागडात शेतकऱ्यांवर आस्मानी संकट : अतिवृष्टीने भातशेतीचा घात

पिकांची नासाडी, शेतकरी चिंतातूर : रायगड जिल्हा शेतकरी संघटनेची नुकसानभरपाईची मागणी 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली-बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔷🔶🔶

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ पाठोपाठ अतिवृष्टीने शेतकरी अक्षरश: हवालदिल झाला आहे.  सुधागडसह  जिल्ह्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीचा फटका येथील भातशेतीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. मायबाप सरकारने कृषी व महसूल प्रशासनाला तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व  योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरींचंद्र शिंदे व  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी  जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन  रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील करणार आहेत. 2020 हे वर्ष जणू  संकटाचे वर्ष म्हणून नोंद झाले आहे. एकापाठोपाठ एक संकट आदळत आहेत. या संकटात शेतकरी मात्र अधिक उध्वस्त होताना दिसतोय. यंदा  शेतात तयार झालेलं पिवळे सोने डोळ्यादेखत उध्वस्त झालेले पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. भातशेती कापणीच्या अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने भातशेतीचा घात केला आहे. याबरोबरच बागायदार व भाजीपाला लागवड केलेले उभे पिक शेतात आडवे झाले. तर अनेक ठिकाणी पिकांची मोठी नासाडी झाली. अतिवृष्टीने  जिल्ह्यात हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याने शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

यंदा पावसाने बर्‍यापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पिक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. शेतकरी  भातकापणीच्या तयारीत असताना नैसर्गिक संकटाने झडप घातली आहे.  यंदा भाताला बाजारात चांगला भाव मिळेल या आशेवर आसलेल्या शेतकर्‍याचा आता हिरमोड झाला आहे. परतीच्या पावसाने शेतकर्‍यावर आस्मानी संकट ओढवल्याची परिस्तीती निर्माण झाली आहे.

पाली सुधागडसह बेणसे, शिहू, झोतीरपाडा, चोळे गांधे, सांबरी, बेणसेवाडी, कुहिरे, तरशेत, जांभुळटेप व अन्य भागातील शेती अतिवृष्टीने धोक्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकर्‍यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यंदा पावसाने मोठ्याप्रमाणावर नुकसान केल्याने सुरवातीपासून आजतागायत झालेला किमान खर्च तरी निघेल का ? की दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार या भितीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी आता खुप मोठ्या नैसर्गीक व आस्मानी  संकटात सापडला आहे. सातत्याने नैसर्गीक  आपत्तीचा शिकार होत असलेल्या शेतकर्‍याला मायबाप सरकारने आधार देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

अशातच लाखोंचा पोशिंदा असलेला बळीराजा जर डोळ्यात आसू घेवून जगत असेल व सरकारकडून देखील त्याची उपेक्षा होत असेल कृषीव्यवसाय येत्या काळात धोक्यात येईल, अन्नधान्याची आयात परवडणारी नसेल परिणामी भावी पिढ्यांना मात्र भुकबळीला सामोरे जावे लागेल असे मत कृषीतज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍याला नैसर्गीक आपत्तीचा नेहमीच सामना करावा लागतो. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, व अवकाळी पावासाने शेतकर्‍यांला जंजजंग पछाडले आहे. शेतीचा खर्च व उत्पादन यात मोठी तफावत होत असून शेतीव्यवसाय आव्हानात्मक व्यवसाय ठरत आहे. अशातच चक्रीवादळ व अतिवृष्टीत भातपिकांची मोठी नासाडी झाली असल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी. व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

हरीचंद्र शिंदे, अध्यक्ष रायगड जिल्हा शेतकरी संघटना
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यामार्फ़त नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनामे अहवाल पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल. 

दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली सुधागड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.