जॉन्सन टाईल्स मधील ६७ कामगारांच्या कपातीनंतर उर्वरित कामगारांना त्याच “पॅकेज” मध्ये व्ही.आर.एस.चे गाजर 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔶🔷🔷
गेल्या काही वर्षांपूर्वी चीनी कामगारांची आयात करून चर्चेत आलेल्या आणि सिरॅमिक टाईल्सच्या उत्पादनात देशात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गडब-कारावी (ता.पेण) येथील एच. अँड आर. प्रिझम जॉन्सन (इं) लि. अर्थात जॉन्सन टाईल्स या कंपनीने रिट्रीचमेंटच्या नावाखाली राज्य कामगार आयुक्तांच्या ७ सप्टेंबरच्या आदेशानुसार ६७ कामगारांची कपात केली आहे. हे कमी म्हणून की काय आता त्या ६७ कामगारांना जे आर्थिक “पॅकेज” देण्यात आले त्यामध्ये कोणतीही वाढ न करता त्याच रकमेत उर्वरित कामगारांसाठी कंपनी व्यवस्थापनाकडून स्वेच्छा निवृत्ती (व्ही.आर.एस.चे) गाजर दाखविण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे या कंपनीत अधिकृत कामगार संघटना असलेल्या मुंबई लेबर युनियनचे सरचिटणीस संजीव पुजारी यांनी २० सप्टेंबरला कंपनीत एक सर्वसाधारण सभा घेऊन कंपनीची ही व्ही.आर.एस. ची ऑफर उरलेल्या कामगारांसमोर सादर केली. त्यामुळे पुजारी यांनी कंपनीकडून कामगार कपातीची जणू सुपारीच घेतल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप कामगारांतून होत आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात कुणाही कामगाराला कमी करू नये असे केंद्र सरकारने स्पष्ट आदेश दिले होते. मात्र हे आदेश धुडकावून जॉन्सन कंपनीच्या व्यवस्थापनाने कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेच्या सुरुवातीपासून देत असलेले कंपनी नुकसानीत असणे या मुख्य कारणासह मालाला उठाव नसणे, उत्पादन शुल्कात झालेली मोठी वाढ अशी अनेकविध कारणे देत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांकडे १६८ पैकी ८५ कामगारांची कपात करण्यासाठी १० जुलै, २०२० रोजी अर्ज सादर केला. या अर्जासोबत ८५ कामगारांची यादीही जोडण्यात आली. कामगारांची नोकरी जाणार असल्याने त्यांना चांगला आर्थिक मोबदलाही मिळायला पाहिजे यासाठी कामगार संघटना व व्यवस्थापन या दोघांनीही चर्चा करून ८-१० दिवसांत सामोपचाराने निर्णय घ्या असे कामगार आयुक्तांनी २० ऑगस्टला याप्रकरणी झालेल्या पहिल्याच तारखेला सुचविले होते. त्यानंतर याप्रकरणी २३ ऑगस्टला व्यवस्थापनासोबत ठाणे येथे झालेल्या पहिल्याच बैठकीत जॉन्सन व्यवस्थापनाने त्यांच्या पूर्व इतिहासा प्रमाणे “नन्नाचा” पाढा सुरु केला. त्यानंतर पुन्हा लगेच २५ ऑगस्टला ठाणे येथेच झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतरही कामगार आयुक्तांनी पुन्हा एक बैठक घेण्यास सांगितले असतांना व्यवस्थापनाने यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तसेच त्यासाठी मुंबई लेबर युनियनचे संजीव पुजारी यांच्याकडूनही कोणतेही विशेष प्रयत्न सुरु आहेत असे दिसून आले नाही. याच दरम्यान कामगार आयुक्तांनी दिलेली मुदत संपुष्टात आल्याने जॉन्सन व्यवस्थापनाकडून कमी करण्यात येणाऱ्या कामगारांसाठी “अंतिम ऑफर” चा प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्याचा समावेश आपल्या ७ सप्टेंबरच्या आदेशात करून तसेच मुंबई लेबर युनियनने व्यवस्थापनाच्या कामगार कपातीच्या अर्जावर आयुक्तांना दिलेल्या उत्तराच्या आधारे कामगार आयुक्तांकडून ८५ पैकी ६७ कामगारांनाच कमी करण्याची परवानगी देण्यात आली. या ६७ कामगारांमध्ये ३ विद्यमान कमिटी मेंबरचाही समावेश होता. कामगार कपातीमध्ये आपला ८५ हा आकडा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ झालेल्या जॉन्सन व्यवस्थापनाकडून युनियनच्या माध्यमातून नंतर कामगारांना त्याच “पॅकेज” मध्ये व्ही.आर.एस.चा प्रस्ताव ठेवण्यात आला.
जॉन्सन टाईल्स मधील ज्या कामगारांनी अगदी तुटपुंज्या वेतनावर नोकरीला सुरुवात केली. त्यानंतर कंपनीत अधिकृतपणे लावण्यात आलेल्या मुंबई लेबर युनियनचे दिवंगत सरचिटणीस व थोर कामगार नेते यांनी येथील कामगारांवर मुलाप्रमाणे प्रेम केले. कामगारांचे वेतन वाढविण्यासाठी चांगले वेतन करार करून कामगारांना समाधानकारक वेतनावर आणून ठेवले. आणि आता कुठे चांगले दिवस आलेले असतांनाच आपली ऐन तारुण्यातील व उमेदीची २३ वर्षे कंपनीसाठी इमाने इतबारे नोकरी करणाऱ्या त्याच कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम शरद राव यांच्या पश्चात पुजारी यांनी केल्याचा आरोप कामगारांतून होत आहे. युनियन क्षेत्रातील ४० वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले संजीव पुजारी विद्यमान तीन कमिटी मेंबरनाही वाचवू शकले नसल्याने असला अनुभव काय कामाचा ? तसेच यामुळे माजी केंद्रीय मंत्री सर जॉर्ज फर्नांडीस, शरद राव यांच्या नावामुळे एकेकाळी दबदबा निर्माण झालेल्या मुंबई लेबर युनियनची धार किती बोथट झाल्याचा प्रत्यय या प्रकारावरून दिसून आला आहे. त्यामुळे बहुतांश कामगारांनी या युनियनचे राजीनामे पाठवून दिले आहेत. तर नोकरी गमावलेल्या कामगारांना मिळालेली रक्कम ही समाधानकारक नसल्याने तसेच कमी केलेल्या कामगारांचे सरासरी वय ४५ ते ५० वर्षे असल्याने या वयात नोकरी कोण देणार ? त्यामुळे या कामगारांनी अखेर संस्थापक-सरचिटणीस असलेल्या हिराजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगार भारती या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून कामगार आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या जॉन्सन टाईल्स कंपनीचे उत्पादन बंद असल्याने कंपनी सुरु होईल की, नाही तसेच जर सुरु झालीच अजून किती काळ चालेल अशाप्रकारचे भितीपूर्ण वातावरण तयार झाले असल्याने तसेच कामगार आयुक्तांकडून नोकरी वाचूनही अधिक मोबदला मिळत नसल्याने व ही व्ही.आर.एस. ची ऑफर स्वीकारून न्यायालयात दादही मागू शकत नसल्याने नोकरी वाचली तरी उपयोग काय ? त्यामुळे मिळतात त्या पैशांत नोकरीवर पाणी सोडावे की, कंपनीत थांबावे अशा द्विधा मन:स्थितीत उर्वरित कामगार वर्ग सापडला आहे. त्यामुळे जॉन्सनच्या व्यवस्थापनाने दाखविलेल्या व्ही.आर.एस.च्या गाजराच्या पुंगीला किती लोक बळी पडतात याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात जॉन्सन टाईल्सच्या एच.आर. विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद जोशी तसेच मुंबई लेबर युनियनचे सरचिटणीस संजीव पुजारी यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.








Be First to Comment