आम्हाला आमची हक्काची जागा केव्हा मिळणार ? किती वर्षे वाट पाहणार ?
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔷🔶
गेल्या अनेक वर्षापासून पनवेल ते इंदापूर पर्यंतच्या महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या धीम्या गतीच्या कामामुळे अनेकांची रोजीरोटी दुरावली गेली आहे. पनवेल ते इंदापूर पर्यंत ठरावीक अंतर सोडून रस्त्याच्या कडेला असलेली लहान-लहान कटलरी दुकान, चहाच्या टपऱ्या, वडापाव तसेच अन्य लहान मोठी दुकानं रस्ता रुंदीकरणामुळे उद्ध्वस्त झाली आहेत.
विशेषतः सुकेली खिंड पासून दोन किमी अंतरावर पासून लहान टपरी, तसेच खांब, पुगाव, वरसगाव, वाण्याची तळवली पासून इंदापुर पर्यंत अनेक लहान-मोठी वडापाव, तसेच चहाच्या टपऱ्या टाकल्या होत्या त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
रस्ता रुंदीकरणाचे काम आज ना उद्या होईल आपल्याला आपले हक्काचे दुकान, टपरी साठी जागा मिळेल या आशेवर हजारो दुकानदार आहेत. परंतु अद्यापही त्यांना हक्काची जागा मिळाली नाही. रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे वस्तान ठोकले आहे.
या वर्षी तरी दिवाळीपर्यंत आपल्या हक्काची जागा मिळेल या आशेवर टपरीधारक होते परंतु त्यांची ही आशा फोल ठरली. कारण रस्तारुंदीकरण आज ना उद्या होईल या आशेवर असताना जेमतेम आपला व्यवसाय करत असताना गेल्या सात महिन्यापासून कोरोनाने हौदस माजविल्यामुळे अनेक टपरी धारकांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.
रस्त्याने जाणारे-येणारे वडा पाव खायचे ते सुद्धा गेली चार ते पाच महिने फिरकलेच नाही. मार्च महिन्यात कोरोनाने डोकेवर काढल्यानंतर लॉकडाऊन झाले. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जणांनी घर सोडले नाही.
या कालावधीमध्ये अनेक लहान टपरीधारका सह अनेक लहान-मोठ्या तसेच किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. संसाराचा गाडा चालवायचा कसा ? असा अनेकांना मोठा प्रश्न पडला.
अनेकांनी ना ईलाजाने पिढ्यान पिढ्या चालत असलेला व्यवसाय बंद केला. या रस्ता रुंदीकरणात मध्ये एसटी स्टँड उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचा ऊन-पावसाचा निवारा सुद्धा नष्ट झाला. त्यामुळे नेमक्या गाड्या कुठे थांबणार असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडलेला आहे.
ज्यांनी अगोदरच तीस-पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या दुकानाच्या मागे जागा घेतलेल्या होत्या त्यांनी आपल्या जागी दुकान थाटलेली आहेत. ते आता हळूहळू सावरत आहेत. मात्र रस्त्यालगत असलेल्या टपरी धारकांचे काय? त्यांना आपली हक्काची जागा मिळायला आणखी किती दिवस लागणार?
विस्कटलेला संसार कधी स्थिर होईल. असे प्रश्न रस्ता रुंदीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे अनेकांना पडलेला आहे.







Be First to Comment