सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे : 🔶🔷🔷🔶
अलिबाग निसर्ग चक्रीवादळाला साडेतीन महिने होऊन गेले, तरीही पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्तांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. आज, उद्या मिळेल या आशेवर नुकसानग्रस्त तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. तुमचे पैसे बॅंकेकडे पाठवीले आहेत, तुमचा खातेक्रमांक चुकीचा आहे, अशा प्रकारची उत्तरे देत नुकसानग्रस्तांची अवहेलना केली जात आहे. या संदर्भात अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जाब विचारण्यात आला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चुकीच्या बॅंकींगमुळे नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे म्हणणे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दीड महिन्यापुर्वी मांडले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांचे बॅंकखाते क्रमांक, केवायसी, आधारकार्ड, नावामधील दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु तहसील कार्यालयांकडून बॅंकांना देण्यात आलेल्या नावांच्या याद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात चुका असल्याने त्याचा भुर्दंड नुकसानग्रस्तांना भोगावा लागत असल्याचे म्हणणे शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांचे आहे.
गुरुवार (ता.24) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना राजा केणी यांनी या चुकीच्या याद्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख सतिष पाटील, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील, माथाडी तालुका अध्यक्ष अप्पा पिंगळे उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आतापर्यंत साधारण 550 कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मते ही सर्व मदत बॅंकांकडे वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील 20 टक्के नुकसानग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
याबद्दल नुकसानग्रस्तांच्या मनात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील साडेतीन महिने जिल्ह्यातील वंचित नुकसानग्रस्त तहसील कार्यालय, बॅंकांकडे खेटा मारत आहेत. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या 20 टक्के नुकसानग्रस्तांना घर दुरुस्तीची तातडीची मदत, त्यानंतर शेतीची नुकसानभरपाई अद्याप मिलालेली नाही.
नुकसानग्रस्तांनी तातडीच्या दुरुस्तीसाठी स्वत:ची पदरमोड करुन खर्च केलेला आहे. पहिल्याच टप्प्यातील मदत या नुकसानग्रस्तांना मिळालेली नसल्याने पुढील वाढीव नुकसानभरपाई, शेतीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केली जात आहे. या संतापाचा उद्रेक होण्यापुर्वी खात्यावर नुकसानभरपाई वर्ग करण्याची मागणी राजा केणी यांनी केली आहे.







Be First to Comment