भिसेगाव ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगित ! 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔶🔶🔷🔷
कर्जत चारफाटा ते श्रद्धा हॉटेल रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहे . राष्ट्रीय महामार्ग ७६ अन्वये कर्जत ते डोणे या रस्त्यांच्या अंतर्गत शासनाने हायब्रीड अँन्यूटी या योजने मार्फत हे काम चालू आहे . एकूण ५२ करोड रुपयांचे हे काम असून त्यानुसार भिसेगाव गेट श्रद्धा हॉटेल येथपर्यंत कामाची नोंद असताना श्री . पी . पी .खारपाटील ( पनवेल ) या ठेकेदाराने चारफाटा ते डोणे हे काम पूर्ण केले आहे , मात्र उर्वरीत काम अर्धवट अवस्थेत ठेकेदाराने ठेवले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री . खारपाटील या ठेकेदारावर कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत की ” ब्र ” शब्द देखील काढत नसल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
यावरून मार्ग काढताना वाहन चालक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे , यामुळे नागरिकांत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप पसरला आहे .
याविरोधात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुलकर्णी तसेच दिनेश भरकले व भिसेगाव ग्रामस्थ मंडळाने उपोषणाचा मार्ग अवलंबला होता , त्यानुसार ते २३ सप्टेंबर २०२० रोजी उपोषणास बसणार होते , मात्र मा . कार्यकारी अभियंता – पनवेल यांनी ठेकेदार खारपाटील यांना लेटर काढून सदरील काम करण्याचे आदेश दिले आहेत व तसे संबंधित उपोषणकर्त्यांना देखील कळविले होते . परंतु हे काम कुठल्या तारखेला चालू करणार याचा पत्रात उल्लेख नव्हता शिवाय मा . कार्यकारी अभियंता हे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना होमकोरंटाईन होण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तो कालावधी पूर्ण होईपर्यंत उपोषणास बसल्यास कोणी निर्णय घेऊ शकत नसल्याने आपण उपोषण तात्पुरते स्थगित करावे , अशी विनंती उपोषणकर्ते यांना करण्यात आली.
त्यामुळे अमोघ कुलकर्णी , दिनेश भरकले व भिसेगाव ग्रामस्थ मंडळाने तात्पुरते उपोषण स्थगित केले असून या दहा दिवसांत चारफाटा ते न्यू बिकानेर अशा मार्गाचे काम संबंधित ठेकेदाराने चालू न केल्यास पुढे कुठलीही विनंतीला मान न देता २ ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी आम्ही आमरण उपोषणास बसणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी कळविले आहे .
भिसेगाव रस्त्यासाठी सदरील लढाई ही आरपारची असून तात्पुरते स्थगित केलेले उपोषण न्याय न मिळाल्यास पुढे चालू करू , असे मत उपोषणकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे .







Be First to Comment