सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶
काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने उरणकरांचे बेहाल करून टाकले आहे. तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. याला सर्वस्वी शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
उरणचा औद्योगिक विकास होत असताना पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद करण्यात आले तर काही ठिकाणी मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळेच पावसाचे पडणाऱ्या पावसाचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी होऊन अवस्था कठीण बनत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
काल मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची वाहने चालवितांना कसरत करावी लागत होती.

त्यात रस्ताही खराब असल्याने रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. जागेवरून एक ते दोन तास वाहने हलविता येत नव्हती एवढी बिकट अवस्था झाली होती.
यावर्षी उरलेल्या शेतीसाठी पूरक असा पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग चांगले पीक मिळेल या खुशीत होता. परंतु काल पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आज सकाळ पासून उरणमधून बाहेर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांपैकी बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार वर्गांच्या गाड्या रस्त्यातच बंद पडल्या होत्या. तसेच मोठ्या बसही पाण्यात अडकून पडल्या होत्या.

त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेकांना कामावर जाण्याऐवजी अर्ध्यावरून घरी परतून दांडी मारावी लागली आहे. यातून उरणकरांची कधी सुटका होईल अशी चर्चा सुरू होती.







Be First to Comment