Press "Enter" to skip to content

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्राचार्य शां य. गव्हाणकर शाळेतील शिक्षकांच्या अनुपस्थिती मुळे चर्चेला उधाण 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔷🔶



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरान मध्ये सुध्दा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सर्वत्र माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस सुरुवात झाली असल्याने या महत्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ नुकताच येथील शास्त्री हॉलमध्ये नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांसह विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे,नगरसेवक चंद्रकांत जाधव , नगरपरिषदेचे अभियंता, काही लोकप्रतिनिधी यांसह नागरिक तसेच या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे स्वयंसेवक उपस्थित होते.

ह्या सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी खुद्द नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी नियुक्त स्वयंसेवकांसोबत प्रत्येक सर्वेक्षण ठिकाणी हजेरी लावून नागरिकांना प्रोत्साहन देत होते.त्यामुळेच या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

या सर्वेक्षणामध्ये गव्हाणकर शाळेतील शिक्षकांच्या अनुपस्थिती मुळे चर्चेला उधाण आले होते.दरवेळी शासनाच्या कुठल्याही मोहिमेसाठी अथवा सर्वेक्षणासाठी शिक्षकांना पाचारण करण्यात येत असते. याही वेळेस नगरपरिषदेतील काही शिक्षक या मोहिमेत सहभागी झाले होते तर नगरपरिषदेच्या जागेत प्राचार्य गव्हाणकर यांची शाळा असून या शाळेतील शिक्षकांची स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा होती.परंतु त्यांना गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका (कार्यालय प्रमुख) यांनी लेखी आदेश न दिल्यामुळे ते शिक्षक सहभाग होऊ शकले नाहीत.

गव्हाणकर ही शाळा खाजगी ट्रस्टची असल्याने संबंधित शिक्षकांनी मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की आरोग्य पथकात शिक्षकांना नियुक्त करण्याबाबत शासनाने कुठल्याही प्रकारचा आदेश वा सूचना दिल्या नाहीत.
सदर सर्वेक्षण करत असताना आवश्यक ती खबरदारी घेऊन सुध्दा जर कोविड-१९ ची लागण झाल्यास मिळणारे उपचार अथवा लाभ कोणामार्फत मिळणार याचाही उल्लेख कोणत्याही आदेशात नाही.

त्याचप्रमाणे सर्वेक्षण करण्याबाबत शाळेकडून अथवा कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश दिला नाही.त्यामुळे कल्पना पाटील या गव्हाणकर शाळेच्या कार्यालयीन प्रमुख असल्याने त्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी लेखी आदेश द्यावेत असे या गव्हाणकर शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे सर्व शिक्षक शासनाने काढलेल्या परिपत्रकात जरी शिक्षकांचा सहभाग असावा असे नमूद नसताना सुध्दा केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून गावाच्या महत्वकांक्षी कार्याच्या सर्वेक्षणात सहभागी होणार होते.परंतु प्रबळ इच्छा असताना कार्यालय प्रमुखांचे आदेश त्यांना प्राप्त झाले नाहीत.

त्यामुळेच ट्रस्टचे शिक्षक सहभागी होऊ शकले नाहीत. तर याबाबत कार्यालय प्रमुख कल्पना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, माझ्याकडे शिक्षकांचे अर्ज आले आहेत यातील एका शिक्षकांना अस्थमा तर दुसऱ्या शिक्षकांना उच्च रक्तदाब हा आजार आहे.त्यामुळे ते या सर्वेक्षणात सहभागी होऊ शकत नाहीत.शासनाच्या परिपत्रकात शिक्षकांची सर्वेक्षणात नियुक्ती करावी असा उल्लेख नाही. की त्यांना विमा कवच सुध्दा नाही. आम्हाला नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी यांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी तोंडी सूचना केल्या होत्या लेखी पत्र दिले नव्हते.

परंतु आम्ही गव्हाणकर या संस्थेचे कर्मचारी आहोत त्यामुळे संस्थेच्या निर्णयानुसार आम्ही कामे करतो.याबाबत आमच्या शाळेचे विश्वस्त दादा गव्हाणकर यांना सुध्दा या विषयी सांगितले होते.खरे पाहता या सर्वेक्षणात एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक अशीच रचना आहे शिक्षकांनी सहभाग घ्यावा असा कुठेही शासनाच्या आदेशात उल्लेख नाही.

या सर्वेक्षणात शिक्षक अनुपस्थित राहिल्याने राजकीय दृष्ट्या तर्कवितर्क काढले जात होते त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.