सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । अमोल नाईक । 🔶🔷🔷🔶
रोहा तालुक्यातील महादेवखार येथील ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन दामोदर कांडणेकर यांचे कोरोना काळात निधन झाले.लॉकडाऊन काळात असणारी बंधने यामुळे इच्छा असून देखील अशा उमद्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहणे शक्य झाले नव्हते.शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी गोवर्धन कांडणेकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला त्यांच्या स्मरणार्थ अन्नधान्य किट वाटप करत अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामुळे मरावे परी किर्ती रूपे उरावे ही उक्ती देखील सार्थ झाली आहे.

रोहा तालुक्यातील महादेवखार ग्रामपंचायत सदस्य तसेच रोहा तालुका खरेदी विक्री संघ संचालक गोवर्धन कांडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शेकाप सरचिटणीस आ भाई जयंत पाटील,शेकाप नेते पंडीत पाटील,जिप सदस्य तथा जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामांना न्याय देत अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली होती.शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या या लढवय्या कार्यकर्त्यांची अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली होती.यामुळे गोवर्धन कांडणेकर सारख्या गुणी कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून शेकाप महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी २५० अन्नधान्य किटचे वाटप स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे.चित्रलेखा पाटील यांच्या या मदतीमुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायतीच्या सरपंच व कांडणेकर यांच्या कन्या पूनम कांडणेकर – गोविलकर यांनी दिली आहे.
याप्रसंगी कांडणेकर यांचे चिरंजीव प्रतिक कांडणेकर,ग्रामपंचायत सदस्य निलम वारगे,चंद्रकांत कांबळे,राज जोशी,अनिल मोरे,हिराजी कांडणेकर,महादेव जोशी,नारायण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते







Be First to Comment