Press "Enter" to skip to content

जेएनपीटी महामार्गावर अवजड वाहनांची मक्तेदारी

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

जेएनपीटी राष्टीय महामार्गावरील रस्त्यावरच ट्रेलर व ट्रक ही अवजड वाहने नेहमीच भररस्त्यावर उभी केलेली असतात. यामुळे अनेक समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे. याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक पोलीस शाखेकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.

याबाबत लवकरच परिवहनमंत्री, आरटीओ व वरिष्ठ वाहतूक पोलीस शाखेकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.
सदर मार्गावरील सोनारीजवळील पुलापासून टी पाॅईंट पर्यंत तसेच रस्त्याच्या अनेक ठिकाणी ट्रेलर व ट्रक ही अवजड वाहने कोणतीही शिस्त न पाळता रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्कींग करुन उभे केलेले असतात. यामुळे अपघात व वाहतुक कोंडी अनेकवेळा होत आहे. यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

जेएनपीटी प्रशासनाने अवजड वाहने रस्त्यावर उभी राहू नये म्हणून अधिकृत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तरीही सर्वाधिक अवजड वाहने भर रस्त्यात उभी रहात आहेत. जेएनपीटी प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र पार्किंग असूनही त्याचा उपयोग होत नाही. यामुळे पार्किंग ही तोट्यात जात असल्याचे पार्किंग चालक सांगतात. याबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता त्यांनी पार्किंगचा दर जास्त असल्याने व रस्त्यावर उभी केल्यावर वाहतूक पोलिसांना ठराविक रक्कम दिल्यावर ते कारवाई करीत नाहीत असे सांगतात. तर मालक वर्ग सांगतात की चालक आमच्याकडून पार्किंगसह पैसे देत असल्याचे सांगतात.

म्हणजे मधल्यामध्ये चालकां बरोबर वाहतूक पोलिसांचाही फायदा यामुळे होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर वाहतूक शाखेची पोलीस चौकी असूनही अवजड वाहने बिनधास्त उभी असतात यामुळे भूमिका संशयास्पद वाटते.

महामार्गावर अशा प्रकारे वाहने उभी करण्यास परवानगी नसल्याचे समजते. तसे असेल तर मग हे ट्रेलर व ट्रक ही अवजड वाहने खुलेआम रस्त्याच्या कडेलाच कशी उभ रहातात. त्यांना कोणाचा तरी आशिर्वाद असल्याशिवाय ते अशा प्रकारे भररस्त्यात अवजड वाहने उभे राहू शकतच नाहीत अशी चर्चा सुरू आहे.

या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्यालगत बरेच हाॅटेल, ढाबे, गॅरेज हे सुद्धा विनापरवाना सुरू आहेत. यामुळेही रस्त्यावर दोन्ही बाजुला काही ठिकाणी २ ते ३ लाईनने गाड्या उभ्या असतात. मागच्या वर्षी उरण युवातर्फे याविरोधात एक मोठे यशस्वी आंदोलन केले होते. त्यानंतर काही काळासाठी कारवाई झाली नंतर परिस्थीती जैसे थे पुन्हा दिसायला लागली.

याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही उरणमधील वाहतूक पोलीस शाखेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसत असल्याने आता काही सामाजिक संघटना या विरोधात परिवहन मंत्री, आरटीओ व नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखा यांच्याकडे तक्रार करून हा राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्याची मागणी करणार असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.