Press "Enter" to skip to content

चिरनेर जंगल सत्यग्रहाच्या 90 व्या हुतात्मा स्मृतीदिनावर कोरोनाचे सावट !

फक्त पोलिसांतर्फे बंदुकीच्या फैरी झाडून देणार शासकीय मानवंदना 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण ( बातमीदार) 🔶🔷🔷🔶

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90 वा स्मृती दिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला आहे.दरवर्षी या दिवशी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय इतमानाने साजरा करण्यात येणारा भारदस्त कार्यक्रम कोरोनाच्या सावटाखाली आला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता.त्याच वेळी चिरनेर येथेही 25 सप्टेंबर 1930 साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले होते.शांततामय रितीने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी,आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते.

यामध्ये 20 ते 22 वयोगटातील युवकांचाच अधिक भरणा होता. जंगल का कायदा तोड दिया,इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलन कर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट केला.या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादु कातकरी दोघेही – चिरनेर,आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे,आंनदा माया पाटील – धाकटीजुई,रामा बामा कोळी – मोठीजुई,
रघुनाथ मोरेश्वर शिंदे (न्हावी) – कोप्रोली,परशुराम रामा पाटील – पाणदिवे व हसुराम बुद्धाजी घरत – खोपटे या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. तर अनेकजण जखमी झाले.

संग्रहित छायाचित्र

स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिध्द आहे. या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मुळगावी उभारली आहेत.
स्वातंत्र्य संग्रामातील या महत्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढयाचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहावी यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

शासकीय इतमानाने साजराही करण्यात येणार्‍या या कार्यक्रमात बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना दिली जाते.तसेच पुष्पचक्र वाहुन हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.त्याचबरोबर हुतात्म्यांच्या वारस, कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार, सन्मान करण्यात येतो.यावेळी लोकप्रतिनिधी, मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पुढारी, नेते, नागरिक, विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते.मात्र ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि स्वातंत्र संग्रामातील सुवर्ण पान म्हणुन ओळखला जाणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा कार्यक्रम अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे.

25 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या स्मृती दिनाच्या कार्यक्रम सध्या कोरोनाच्या सावटाखाली आला असला तरी तो कशा पद्धतीने साजरा करावा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे.दरवर्षी कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे निधीसाठी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
श्रीमती निलम गाडे — गटविकास अधिकारी उरण
यावर्षी गर्दी टाळून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसह, नागरिकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार नाही. अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन करीत चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाईल.
भाऊसाहेब अंधारे — तहसीलदार उरण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.