Press "Enter" to skip to content

सर्वेक्षण पथकाद्वारे घरोघरी जाऊन होतेय आरोग्य तपासणी

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला शिहू बेणसे विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶

घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करताना सर्वेक्षण पथक

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून देश व राज्यात देखील कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे.  कोरोना विषाणूच्या  प्रादूर्भावामुळे वाढती रुग्णसंख्या व मृत्यूमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असून हे रोखण्यासाठी राज्यसरकाने  यापुढे कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिहू बेणसे विभागात आरोग्य विभागाची टीम आपले कर्तव्ये जबाबदारी चोखपणे बजावताना दिसत आहे.

गडब् आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ.गांगुर्डे ,डॉ.प्रतीक म्हात्रे वैद्यकीय अधिकारी, मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक तुकाराम मोकल, आरोग्य सेवक आर. एल. पिंगळे, आशा सेविका, संगीता ब्राह्मणे,  ज्योती पाटील, रश्मी कुथें  आदींची टीम घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी व योग्य  ते मार्गदर्शन करीत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत शहर,गाव,पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

या मोहिमेची पहिली फेरी दि.15 सप्टेंबर 10 ऑक्टोबर 2020 आणि दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 अशा टप्प्यात होत आहे. या मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या (co-morbid) व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, SARI/ ILI रुग्णांच्या भेटीद्वारे सर्वेक्षण करणे,त्यांची कोविड-19 तपासणी आणि उपचार तसेच गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकाला कोविड-19 बाबत आरोग्य शिक्षण देणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे असून शिहू बेणसे विभागात या मोहिमेची काटेकोरपणे अंमल बजावणी होत असल्याचे दिसत आहे. 

शिहू बेणसे विभागातील झोतिरपाडा, मुंढानी,  चोळे गांधे, शेतजुई,जांभुळटेप, तरशेत, साखळी,  बेणसेवाडी, कुहिरे , तसेच असंख्य आदिवासी वाड्या पाड्यात घरोघरी जाऊन  हे सर्वेक्षण पथक कोव्हिडं योध्याची महत्वपूर्ण भूमिका चोख बजावताना दिसत आहे.  रायगड जिल्ह्यामध्ये सदर मोहीम दि.15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये राबविण्यात येत असून या मोहिमेसाठी 1 हजार 500 पथके तयार करण्यात आलेली आहेत.

गृहभेटीच्या वेळी येणाऱ्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करून त्यांच्या घरातील सदस्यांची आरोग्य विषयक खरी माहिती द्यावी व आपली आरोग्य विषयक तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आवाहनाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.