Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरिषद कार्यक्षेत्रातील जीवन प्राधिकरणाच्या कामाचे तीन तेरा !

सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान : 🔷🔶🔷🔶



मागील दहा वर्षापासून इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामे सुरू आहेत परंतु अद्यापही कामांची पूर्तता केली जात नसून पाणी कनेक्शन जोडण्या करतांना नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे प्राधिकरणाच्या ठेकेदारांने जागोजागी पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदल्याने करोडो रुपयांच्या रस्त्यांची अक्षरशः अवस्था बिकट झाली आहे.

त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला नेहमीच पाठिशी घातले जात असल्याने या ठेकेदाराची एकप्रकारे मक्तेदारी झाली आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी रस्त्याखालून गेलेल्या पाणी कनेक्शन दुरुस्ती करताना रस्ते खोदले जात आहेत. हे पेव्हर ब्लॉकचे रस्ते पूर्ववत केले जात नाहीत त्यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर अनेक ठिकाणी एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिका मधून नेताना खूपच अडचणी येत आहेत.
वारंवार सांगून देखील ठेकेदारांना याबाबत स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून एकच ठेकेदार ही कामे करत आहे ती पूर्ण केव्हा होणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती असताना देखील ते ठेकेदाराला समज का देत नाहीत त्याचे लांगुलचालन आजही का सुरू आहे यामध्ये काय गौडबंगाल आहे.उलट अनेक वेळ वाढीव बिलाची मंजुरी सुध्दा दिली जात आहे.

काही भागात रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोऱ्या तोडल्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वहात असते यामुळे मोठया प्रमाणावर रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सातत्याने रस्त्यांच्या दुरुस्ती मुळे नगरपरिषदेच्या आर्थिक तिजोरीवर भुर्दंड येणार आहे. आगामी काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्याचे काम क्ले पेव्हर मध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे निदान पुढील महत्वपूर्ण कामे लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी संबंधीत जीवन प्राधिकरण ठेकेदारांना समज तरी देऊन काही पाणी कनेक्शनची कामे असतील ती अगोदरच पूर्ण करावीत जेणेकरून नागरिकांना पुढील अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी असेही बोलले जात आहे.


एखादया नागरिकाला पाण्याचे कनेक्शन घ्यावयाचे झाल्यास रस्ता खोदण्यासाठी अगोदरच अनामत रक्कम घेतली जाते परंतु नगरपरिषदेने संबंधित ठेकेदारांकडून रस्त्याच्या होणाऱ्या वाताहाती कामी काहीच अनामत रक्कम न घेतल्याने करोड रुपयाचे रस्त्याचे नुकसान झालेले दिसत आहे.मागील काही वर्षांपासून ही कामे सुरू आहेत.रस्त्याच्या मोऱ्या तोडल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन अनेक रस्त्याची धूप झाली आहे.

सरकारी नियमानुसार प्रथम अनामत ठेकेदाराने द्यायला पाहिजे.ब्लॉक बसविताना खाली वर बसविले जातात.ते व्यवस्थित पूर्ववत करीत नाही त्यामुळे लेवल मॅच होत नाही. लोकांना भावनिक करून पाणी येणार नाही असे सांगून रस्ते खोदले जातात आजपर्यंत त्या ठेकेदारांकडून अनामत रक्कम का घेतली गेली नाही हे सुध्दा एक कोडेच म्हणावे लागेल. पेव्हर ब्लॉक सुध्दा खोदलेले असून ते रस्ते व्यवस्थित केले गेले नाहीत.त्यामुळे आंधळा दळतय अन कुत्र पिठ खातय अशीच परिस्थिती सध्यातरी निर्माण झाली आहे.


शिवाजी शिंदे — विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.