Press "Enter" to skip to content

पालकमंत्री आदिती तटकरेंनी श्रीवर्धनच्या नागरिकांचे केले आरोग्य प्रबोधन

श्रीवर्धनमध्ये “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” संदेश घेऊन पोहचल्या पालकमंत्री आदिती तटकरे 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / रोहा/समिर बामुगडे 🔶🔶🔷🔷


करोना विषाणूचा प्रादूर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी”ही मोहीम दि. 15 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यास सुरुवात केली आहे. जनतेच्या सहकार्यातून करोना विषाणूचा समर्थपणे सामना करीत त्याचे उच्चाटन निश्चित होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे व्यक्त केला.

श्रीवर्धन नगरपरिषदेत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बाेलत हाेत्या. यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, दर्शन विचारे आदी उपस्थित होते .
करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे राज्यभर विविध ठिकाणी अनेक व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. ही बाब गांभिर्याने घेऊन आपण प्रत्येक ग्रामनिहाय करोना निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पंचायत समिती, नगर परिषद, आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विविध गटांची निर्मिती करून सर्वत्र आराेग्य सर्वेक्षण सुरू केले आहे .

घरात आजारी असलेली प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीच्या आजाराविषयी योग्य माहिती संकलित करून त्या व्यक्तीस आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करून त्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करोनाची लक्षणे असलेली व्यक्ती, करोनाबाधित मात्र लक्षणे नसलेली व्यक्ती या सर्वांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

कराेना आजाराने बाधित झाल्याने अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला . हा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, प्रशासनाने तयार केलेले आरोग्य तपासणी पथक एका दिवसात किमान 50 घरे म्हणजेच जवळपास 250 व्यक्तींची आरोग्य तपासणी करणार आहे. त्यानुसार सर्व नियोजन करण्यात आले आहे. शिक्षक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, नगरपालिका कर्मचारी या सर्वांची या मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जनतेने या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेस सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी व आपल्यातून कराेनाचे पूर्णत: उच्चाटन करू.

जिल्ह्याची पालकमंत्री आणि श्रीवर्धन तालुक्याची आमदार या नात्याने पालकत्वाची जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आज मी स्वतः श्रीवर्धन शहरातील विविध भागातील घरांमध्ये जाऊन लोकांमध्ये करोनाविषयी जनजागृती करीत आहे. आजच्या या गृहभेटींदरम्यान भेट दिलेल्या घरातील व्यक्तींची करोनाविषयी लक्षणे, त्यांची आरोग्यविषयक परिस्थिती, त्यांना असलेले इतर आजार या सर्व बाबी जाणून घेतल्या आहेत.

जिल्ह्यातील तसेच मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून घेवून त्याचे निराकरण करणे, हे माझे कर्तव्यच आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भोस्ते, श्रीवर्धन शहरातील कसबा, मोहल्ला या भागात गृहभेटी देत जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधत करोनाविषयी जनजागृती केली. त्यांनी अनेक घरातील व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधत त्या व्यक्तींचे तापमान, आरोग्यविषयक समस्या, सॅनिटायझर व मास्कचा वापर याविषयी आस्थेने विचारपूस केली व सर्वांना स्वतःची व कुटुंबातील व्यक्तींचीही काळजी घेण्याचे आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.