सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे : अलिबाग 🔷🔶🔷🔶
महाराष्ट्रातील तरूण पखवाज वादक, अलिबाग चे सुपुत्र सुशांत शंकर पाटील यांच्या ” सुरश्री सुशांत ” या युट्युब चॅनेल चा शुभारंभ अलिबाग येथे एका छोटेखानी कार्यक्रमात झाला.
सुशांत पाटील हे महाराष्ट्रातील तरुण सिद्धहस्त पखवाज वादक आहेत.
याप्रसंगी संगीत रसिक व माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील आणि रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ तबला वादक प्रा. जगदीश पाटील – लोणारकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रा. जगदीश पाटील यांनी ” सुशांत पाटील हे एक गुणी कलाकार आणि नव्या पिढीतील एक उत्तर गुरू आहे ” असे मत व्यक्त केले.
ॲड. प्रसाद पाटील यांनी याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करताना, रायगड जिल्ह्यातील पखवाज वादनाची थोर परंपरे बाबत बोलताना ज्येष्ठ पखवाज वादक कै. रामदादा मेस्त्री, कै. शंकरदादा मेस्त्री, ज्येष्ठ पखवाजवादक राजारामबुवा सारडेकर , तालमणी प्रताप पाटील यांचा आवर्जुन उल्लेख केला. या परंपरेत श्री. सुशांत पाटील यांनी आपल्या पखवाज वादनाने खूप मोठी भर घालून ही परंपरा पुढे चालवीत आहेत, असे मत व्यक्त केले. सुशांत हा एक प्रयोगशील पखवाज वादक असल्याचे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

श्री. सुशांत पाटील यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय , मुंबई यांच्या संगीत विशारद(गायन) आणि पखवाज विशारद ह्या पदव्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून यावर्षी
” पखवाज अलंकार ” ही पदवी त्यांना मिळाली आहे. ” प्रज्ञासंपन्न छात्र प्रतियोगीता ” या देश पातळीवरील स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. त्यांना संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल जिल्हा व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरश्री संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या संगीत विषयक विविध उपक्रमाची माहिती कार्यक्रमवेळी देण्यात आली.
या प्रसंगी साईराज गुरव , विनय पाटील, ऋषिकेश झावरे, तुषार नाईक, रूपक मढवी आदी तरुण पखवाज वादक होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सागर राऊत यांनी केले.







Be First to Comment