मनसेच्या वाढिव वीज बिलांसंदर्भातील “भोंगा वाजवा आंदोलनाला” सुधागड प्रशासनाने नाकारली परवानगी…!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷
कोरोनासारख्या महामारीच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांनी सुधागडवासीय अक्षरशः त्रस्त झाले आहेत. अशातच अवाजवी वाढीव वीज बिलांविरोधात सुधागड तालुका महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी (दि. 21) वीज वितरण कंपनीच्या विरोधात व अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी भोंगा वाजवा आंदोलन करण्यात येणार होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासन यांनी आंदोलनाला परवानगी नाकारली.
मात्र या विषया संदर्भात पाली पोलिस स्थानकात मनसे पदाधिकारी, विजवीतरण उपअभियंता, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात प्रत्येक नागरिकाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. मनसे ने भोंगा वाजवा आंदोलन करू नये त्यांच्या मागणीचा शासन स्थरावर सकारात्मक विचार होत असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी पाली सुधागड वीज वितरण कार्यालयाचे उप अभियंता जतीन पाटिल यांनी आपली भूमिका मांडताना विजवीतरण विभागाकडून वीज बिल बाबत कोणत्याही नागरिकाचे शोषण होणार नाही, अशी शाश्वती दिली. याबरोबरच मनसे ने दिलेल्या वाढीव विजबिलांच्या निवेदनाबाबत आम्ही तातडीने वरिष्ठांना कळवले आहे. त्यावर चर्चा चालू आहे. तसेच ज्यांना रीडिंगपेक्षा जास्त बिल आलेत ते पुन्हा तपासून योग्य तो मार्ग काढला जाईल. तसेच बिल भरण्यासाठी तीन टप्पे देवू. असे आश्वासन जतीन पाटील यांनी दिले.
सुधागडवासीय जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी मनसे कायम प्रयत्नशील आहे. ज्या नागरिकांना युनिट दरापेक्षा व रीडिंगपेक्षा जास्त बिले आली आहेत, त्यांनी आपल्या बिलाची झेरॉक्स आमच्याकडे द्यावी असे आवाहन सुनील साठे यांनी केले.
या बैठकीस पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार, पाली पोलिस निरिक्षक बाळा कुंभार, वीज वितरणचे उपअभियंता जतीन पाटिल यांच्यासह सुधागड मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, रोहित दळवी, अंकुश चोरघे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







Be First to Comment