प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔷🔶🔶
भारतीय संस्कृती निसर्गाला देव मानते. आधुनिक विज्ञानाचे कितीही महिमामंडन केले, तरी त्याला मर्यादा आहेत. भारतीय तत्त्वज्ञानानुसार धर्म आणि विज्ञान हे परस्परविरोधी नाहीत. प्राचीन भारतीय ऋषींनी आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेद्वारे विज्ञानाचे सिद्धांत प्रगट केले. त्यामुळे भारतामध्ये शिल्पशास्त्र, अग्नियानशास्त्र, नौकानयनशास्त्र, चिकित्साशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आदी अनेक शास्त्रे अत्यंत प्रगत होती; मात्र मोगल, इंग्रज आणि परकीय आक्रमक यांनी प्राचीन अमूल्य ग्रंथसंपदा नष्ट केली, अनेक गोष्टी चोरून नेल्या, सहस्रो ठिकाणे बळकावली.
स्वातंत्र्योत्तर काळात ‘मॅकाले’प्रणित शिक्षणव्यवस्था अंगिकारून प्राचीन ज्ञानाची उपेक्षा केली गेली. पुढे खरा इतिहास आणि ज्ञान भारतियांपर्यंत पोहचू दिले नाही. या प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
‘अभियंता दिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्राचीन भारत : तंत्रज्ञानात प्रगत भारत’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते. ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमांतून या परिसंवादाचे थेट प्रक्षेपित करण्यात आले. हा परिसंवाद 60 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 2 लाख 28 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.
प्राचीन भारतीय ज्ञान शिकवले गेल्यास भारत विश्वगुरु म्हणून पुनर्स्थापित होईल ! – विजय कुमार उपाध्याय चार वेद हे ज्ञानाचे मूळ स्त्रोत आहेत. वेदांमध्ये बीजरुपाने असलेल्या ज्ञानाचा वेदांग, दर्शनशास्त्र, उपवेद आदींमध्ये विस्तार केला आहे; पण दुर्दैवाने आज प्राचीन ज्ञानग्रंथ अखंडित रुपात उपलब्ध नाहीत. जे प्राचीन ज्ञान उपलब्ध आहे, ते क्रमिक अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. तसे झाले, तर भारत विश्वगुरु म्हणून पुनर्स्थापित होऊ शकेल.
भारतीय दृष्टीचा अभाव, यथार्थ शास्त्राचे अज्ञान, कलुषित हेतू आणि विदेशी विचार यांमुळे आज भारतीय शास्त्राविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. विमानशास्त्र हे कपोलकल्पित असल्याचा अपप्रचार केला जातो; पण आजच्या काळात झालेल्या संशोधनाद्वारेही प्राचीन भारतीय ज्ञानाची पुष्टी मिळत आहे. युरोपमध्ये जी वैज्ञानिक प्रगती झालेली पहायला मिळाली, त्यामागचे ज्ञान परोक्ष रुपाने भारतातूनच अरब, पर्शिया मार्गे युरोपमध्ये गेले आहे, असे प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे अभ्यासक तथा लेखक श्री. विजयकुमार उपाध्याय यांनी सांगितले. जर्मनी येथून गणितज्ञ आणि ‘हिंदु मॅथेमॅटिक्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. भास्कर कांबळे यांनी ‘हिंदु गणितातील ट्रिग्नोमेट्री’ या विषयावर माहिती देत गणिताचा उद्भव ग्रीसमध्ये नाही, तर भारतातच झाला असल्याचे सांगितले.
विदेशी गणित तज्ञांच्या हजारो वर्षे आधी श्लोक वा सूत्र रुपाने माहिती देणारे भास्कराचार्य, आर्यभट्ट, माधव, ब्रह्मगुप्त यांची माहितीही डॉ. कांबळे यांनी दिली. तसेच सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी प्राचीन नौकानयनशास्त्र, तर श्री. विजय कुमार उपाध्याय यांनी शिल्पशास्त्र यांविषयी या परिसंवादात माहिती दिली.


Be First to Comment