Press "Enter" to skip to content

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिवस

मराठी पत्रकार,समाजसुधारक, उत्कृष्ट वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते

सिटी बेल लाइव्ह / व्यक्ती विशेष : संकलन – अजय शिवकर केळवणे 🔷🔶🔷🔶

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर , १८८५ – आणि स्वर्गवास २०नोव्हेंबर १९७३ ला झाला.
हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र .

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.

वृत्तपत्र क्षेत्रात आगमन

तत्वविवेचक या छापखान्यात इ.स. १९०८च्या सुमारास असिस्टंट शास्त्री अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. तेथे लक्ष्मण नारायण जोशी हेडशास्त्री होते. त्या काळात रोज निघणाऱ्या आणि सरकारी दडपशाहीने लगेच गायब होणाऱ्या हंगामी वृत्तपत्रांचे ते छुप्या ररीतीने लेखन करत. अशा छुप्या लेखनाची दीक्षा त्यांनीच ठाकरे यांना दिली. त्याआधी विद्यार्थी असताना ठाकरे यांनी विद्यार्थी हे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानतंर, दोन-तीन साप्ताहिके व इंदुप्रकाश पत्रात ते लेखन करत असत. ठाण्याच्या जगत्समाचार साठीही ते लेख लिहित असत. जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथेकाव्यरत्नावली कार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे सारथी हे मासिक सुरू केले. पत्रव्यवसायातील आपल्या या आगमनाचे श्रेय ठाकरे फडणिसांनाच देतात.

प्रबोधन

प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता. इतिहाससंशोधक वि.का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर कोदण्डाचा टणत्कार (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देवून खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राम्हणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबरच उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता.

अधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक सुधारणांना प्रबोधनने प्राधान्य दिले. प्रि. गो. चि. भाटे, गोपाळराव देवधर, गो. म. चिपळूणकर, भाऊराव पाटील आदींनी या पत्राला पाठींबा दिला. त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्ध होत.

या प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.

क्षात्रजगदगुरूंचे पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले. त्यावेळी ठाकरे यांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड (१९९२) असा टीकात्मक लेख लिहिला. रोखठोक भाषेत लिहिणे, हे ठाकरे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतील असे आहेत. त्याच लेखात ते म्हणतात, मठ आला, की मठाधिपती आले, की सांपद्राय सुरू झाला, सांप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच.

ःःपरप्रातीयांना विरो

मुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने १९२२मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनानंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले. काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. म. ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहित राहिले.
प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ मार्च २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला. या प्रकारचे २रे संमेलन २३-२-२०१४ला पुणे शहरात झाले. साहित्यिक रा.रं. बोराडे अध्यक्षस्थानी होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.