Press "Enter" to skip to content

बेड देता का कुणी बेड?

बेड देता का कुणी बेड?

बेड आहे का हो? हा आत्ता परवलीचा शब्द झाला आहे. कोव्हिड 19 चे समूह संक्रमण सर्वत्र पसरत आहे.प्रत्येक गल्लीत किंवा प्रत्येक सोसायटीत एव्हाना
  कोव्हिड 19 चे रुग्ण सापडू लागलेत.लोकांच्यात भय,जागरूकता,अती सावध पणा आणि हलगर्जी पाणा अशा संमिश्र भावना दिसत आहेत. पण या सगळ्यात ज्यांना अन्य व्याधी आहेत,किंवा ज्यांची प्राणवायू पातळी खालावत जात आहे अशांना मात्र बेड मिळत नसल्याने ते गणपतराव बेलवलकरांच्या थाटात बेड देता का कुणी बेड? असे विचारत फिरत आहेत.
कोव्हिड 19 रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याचे भयाण सत्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.उपचारांच्या अभावी रुग्ण दगावण्याची सुरुवात होते आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट सदैव अस्वस्थ करत राहते ती म्हणजे प्रशासनाच्या कथणी मध्ये आणि करणी मध्ये प्रचंड तफावत आढळते. मुळात सवंग लोकप्रियतेसाठी बातम्या रंगवल्या की प्रशासनाचे काम झाले या अविर्भावात प्रशासन काम करत आहे. रुग्णांसाठी आयसीयू आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार! या स्वरूपाच्या बातम्या तुम्ही आम्ही देखील वाचल्या असतील. परंतु प्रत्यक्षात मात्र नागरिकांची बेडसाठी होणारी वणवण थांबत नाही. खारघर आणि कामोठे हे विभाग कोव्हिड 19 रुग्णांचे हब झाले आहेत.
सिडको च्या माध्यमातून 500 बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारणार ! अशी अत्यंत दिलासादायक बातमी जवळपास दीड महिन्यापूर्वी वाचनात आली होती. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपली पाठ थोपटून घेत या हॉस्पिटलचे श्रेय ओरबडण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात या हॉस्पिटलचे पुढे काय झाले हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. याचे कारण या ठिकाणी पाचशे सोडा पण पाच बेडचे सुद्धा हॉस्पिटल उपलब्ध नाही.
कोव्हिड 19 सदृश लक्षणे दिसू लागताच एखादा रुग्ण चाचणी करण्यासाठी गेला तरीही त्याचा अहवाल येईपर्यंत 24 ते 48 तास उलटून गेलेले असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा अत्यंत महत्त्वाचा काळ हा उपचाराविना गेलेला असतो. अर्थातच प्राणवायू पातळी खालावल्याने नंतर त्या रुग्णाला रुग्णालयात जागा मिळणे अत्यंत गरजेचे असते. नेमके याच ठिकाणी प्रशासन कुचकामी ठरत आहे. बेड उपलब्ध नसल्याने कित्येक पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना चे हे संकट दूर करण्यासाठी रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.