सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔷🔶
माथेरान मधील बहुतांश ठिकाणी अनेक विकास कामे मार्गी लागत असतांना प्रशासनाने आजवर येथील दलित वस्तीकडे सहसा गांभीर्याने लक्ष केंद्रित न केल्यामुळे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून तेथील रहिवाशांना सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण आणि समस्या उद्भवणार नाही यासाठी नगरपरिषदेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी शासनाकडून दलित वस्तीच्या विकासाकरिता मागील काळात आलेला निधी खर्च न केल्यामुळे परत गेला होता तोच निधी पुन्हा “दलित वस्ती सुधार”योजनेंतर्गत उपलब्ध व्हावा यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
माथेरान मध्ये दलित वस्ती आजही उपेक्षित असून ज्याप्रमानात या भागाचा विकास व्हायला अपेक्षित आहे तो आजवर झालेला नाही. शासनाकडून या वस्तीच्या मूलभूत सोयी सुविधा करिता सन २०१९-२० या सालामध्ये निधी प्राप्त झाला होता त्यापैकी काही रक्कम खर्च करून मार्च २०२० पर्यंत रक्कम रुपये नगरपरिषदेत ४३,२९,५४५ शिल्लक होती. परंतु दि.२२ मार्च २०२० रोजी पासून कोरोना या भयंकर आजाराच्या महामारी मुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने दलित वस्ती विकासाकरिता आरक्षित व नगरपरिषदेकडे शिल्लक असलेला निधी परत काही काळ मर्यादेकरिता मागविण्यात आला आहे.
सदरच्या निधी अभावी दलित वस्तीतील अनेक विकास कामे, नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणी सोयीसुविधा या पुर्णतः खुंटलेल्या आहेत. यामध्ये अतिवृष्टीमुळे अंतर्गत रस्त्याची वाताहत झालेली असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे सुध्दा अस्ताव्यस्त झालेली असल्याने या वस्तीच्या आजवर प्रलंबित मूलभूत सुविधांच्या विकास कामांसाठी सदरचा निधी परत मिळावा असेही विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
लवकरच हा निधी प्राप्त झाल्यावर खऱ्या अर्थाने या भागाचा आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास होण्याची चिन्हे या निवेदनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहेत.







Be First to Comment