मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन अपूर्ण इमारत बनली दारुडे व गर्दुलांचा अड्डा 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) 🔶🔷🔷🔶
मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे काम निधी अभावी रखडले आहे. पहिल्याच पावसात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गळती लागली आहे. परंतु ही अपूर्ण असलेली इमारत आता दारुडे व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे.
मोरा सागरी पोलीस ठाण्याला हक्काची जागा नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने शासनाने 85 लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असलेल्या शासकीय जागेवर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतींचे काम सुरू झाले.

सदर इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने पहिल्याच पावसात पाणी झिरपू लागले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराची चौकशी करून दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. आलेला निधी संपल्याने इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत पडून राहिले आहे.
पुढील निधी मिळाल्यानंतरच इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे. मात्र या अपूर्ण असलेल्या इमारतीला दरवाजे नसल्याने या इमारतीचा ताबा दारुडे व गर्दुल्ले यांनी घेतला असून त्यांचा नेहमीचा अड्डा बनला असल्याचे जनतेत बोलले जात आहे.

सदर इमारतीत दारूच्या बाटल्या व चरस, गांजा नशा करण्यासाठी लागणारे साहित्य अनेक कोपर्यांना पडलेले दिसतात. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा एखादी भयंकर घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का ? अशी चर्चा जनतेत सुरू आहे.







Be First to Comment