भारत आता द्विधा अवस्थेत आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रीयेअंतर्गत रेल्वे, मेट्रो, हवाई वाहतूक, कार्यालये, बाजार आणि कंपन्या सर्व काही सुरू झाले आहेत तर दूसरीकडे कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वत: भारताची महामारीपासून महत्तम महामारीकडे घोडदौड सुरू आहे. या घोडदौडीत त्याने जगातील अधिकतर देशांवर मात केली आहे. एक काय तो अमेरिका पूढे आहे. ब्राझील आणि भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा ४१ लाखांच्या जवळपास बरोबरीत पहुंचला, नंतर मात्र भारताची बुलेट ट्रेन एवढी सुसाट धावू लागली की, ब्राझील खूप मागे पडला. रूग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला तर भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. सध्या भारतात दररोज कोरोनाने संक्रमित होणा-या रूग्णांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.
यात शंका नाही की या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं जीव तोडून प्रयत्न करित आहेत. दररोज १० लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आत्तापर्यंत जवळपास ५ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे मात्र १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात तपासणीचा वेग असाच राहिला तर सर्वांची तपासणी करण्यात वर्षे लागतील. याच्या खूप अगोदर कोरोना वरिल लस येण्याची दाट शक्यता आहे. फक्त समाधानाची बाब एवढीच की, आपल्या देशात कोरोनाचा मृत्यू दर इतर देशांपेक्षा कमी आहे. भारतात कोरोनाचा मृत्यू दर १.७ टक्के आहे तर उर्वरित जगात ३.२ टक्के आहे. भारतात रविवार पर्यंत ७८ हजार ५०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिकेत जास्त मृत्यू होत आहेत. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या एक चतुर्थांश आहे सोबत तेथील आरोग्य सुविधा भारताच्या तुलनेत कितीतरी पटींनी चांगली आहे. तरीसुद्धा तिथे कोरोनामुळे होणा-या मृत्यूचा दर जास्त आहे याचे कारण एक तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना बाबतीत अवलंबिलेले धोरण तर दूसरे म्हणजे अमेरिकी जनतेचा अतिआत्मविश्वास. स्वत: डोनाल्ड ट्रंप मास्कचा वापर करित नाहीत, त्यांच्याप्रमाणे तेथील हजारो नागरिक मास्कविना बाहेर पडताहेत त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. अतिआत्मविश्वास आणि बेजबाबदारीची आपल्याकडेही कमी नाही. त्यामुळेच भारतात मोठ-मोठे नेते, अधिकारी, अभिनेते यांच्यासोबत डॉक्टर आणि नर्स सुद्धा कोरोना संक्रमित होत आहेत.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही महामारी केवळ दिल्ली-मुंबई सारख्या मोठया महानगरांपर्यंत मर्यादित होती मात्र आत्ता ती ग्रामिण भागात पाय पसरू लागली आहे. अचानक टाळेबंदी घोषित केल्यामुळे आपल्या गावाकडे पलायन केलेले मजुर या महामारीला सोबत घेवून गेले. आत्ता जस-जस तपासणी त्यांच्यापर्यंत पोहचत आहे, रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. मात्र समाधानाची बाब ही आहे की, उपचारानंतर ठिक होणा-यांची संख्याही चांगली आहे. भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट ७७ टक्क्यांच्या जवळ जावून पोहचला आहे.
भारतात कोरोनावरिल उपचारासाठी काय होत नाहियय? कोरोना लसीवर संशोधन भारतात युद्ध पातळीवर सुरू आहे. स्वदेशी लस समजल्या जाणा-या भारत बायोटेकच्या कोरोना लसीची माकडावरिल चाचणी यशस्वी झाल्याची बातमी नुकतीच आली आहे तर दूसरीकडे सीरम ईन्सटयुटच्या कोरोना लसीची थांबविलेल्या तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीला परत सुरूवात होणार आहे. येत्या अॉक्टोंबर अखेर पर्यंत सीरमच्या या लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण होतील. जर सर्व काही व्यवस्थित झालं तर जगभरातील ८०० कोटी लोकांसाठी हा आशेचा किरण असेल. त्यामुळे कोरोनाचा अंत जवळ आला आहे अस म्हणण्यास हरकत नाही. असं असलं तरी कोरोनावरील लस पूढील वर्षाच्या सुरुवातीला येईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले आहे. आयुष मंत्रालय आणि अन्य काही आर्युवेदिक संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त आणि सुलभ काढे आणले आहेत. होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा गप्प बसलेले नाहीत. त्यांनी आर्सेनिक अल्बम या औषधाचा प्रतिबंधात्मक म्हणून दावा केला आहे. लाखो-कोटयावधी लोक योगासन, प्राणायाम द्वारे कोरोनाचा प्रतिबंध करत आहेत. कोरोना लसीविना आपल्या डॉक्टरांनी कोरोनावरिल प्रतिबंधात्मक उपाय काही प्रमाणात का होईना शोधुन काढला आहे ही समाधानाची बाब आहे. हे स्पष्ट आहे की, भारतात कोरोना वाढत आहे मात्र त्याची भीती सुद्धा कमी होत आहे. जर असं नसत तर लोकं रस्त्यांवर, बाजारात, कार्यालयांत, रेल्वे आणि बस मध्ये दिसले नसते.
सर्वात मोठा चिंतेचा विषय हा आहे की, देशाची अर्थव्यवस्था घसरली आहे. भारताच्या जीडीपी मध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दोन कोटी लोकांच्या नौक-या कोरोनाने गिळंकृत केल्या आहेत आणि दहा कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. जगातील अनेक संपन्न देशांमध्ये जिथे या महामारीने भारतापेक्षा अधिक हाहाकार माजवला, तिथे अर्थव्यवस्थेत १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झालेली नाही. आपण या बाबतीत ब्रिटनवर सुद्धा मात केली आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्थेतील घसरण २० टक्के आहे. संपन्न देशांची सरकारं गैर-सरकारी संस्थांच्या कर्मचा-यांना ८० टक्के पगार स्वत: देत आहेत. भारतात मात्र ज्या लोकांची नौकरी अद्याप गेलेली नाही त्यांच्या पगारात एकतर २५ ते ५० टक्क्यांनी कपात केली आहे नाहीतर त्यांना टाळेबंदी पासुन पगाराचा एक छदामही मिळालेला नाही. सरकार मात्र मोठ-मोठया घोषणा करून मोकळे झाले आहे.
हे ठिक आहे की, बाजारपेठा आणि कंपन्या परत सुरू झाल्या आहेत, मात्र ग्राहक कुठे आहे? दुकानांमधील माल कोण खरेदी करेल? अगोदरच जनता नोटबंदी,जीएसटी आणि वाढत्या महागाईने त्रस्त होती, आत्तातर त्यांचे खिसेच रिकामे आहेत. देशात ७० ते ८० कोटी लोक असे आहेत ज्यांचे पोटच खाली आहे. त्यांना आपले पोट भरण्यासठी रोज विहीर खोदावी लागते. जर सरकार आणि समाजाने त्यांची दखल घेतली नाही तर अराजकता पसरायला वेळ लागणार नाही. मरतील, नाहीतर काय करतील? केवळ पोपटपंछी करून काम चालणार नाही. यावेळी हे महत्वाचे आहे की, लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे, जेणेकरून ते खरेदी करू शकतील. सरकार या बाबतीत लवकरच आवशक पाऊले ऊचलेल मात्र सरकारपेक्षाही जास्त जबाबदारी समाजाची आहे. कित्येक मंदिरं, मस्जिदया, गुरुद्वारे, जैन संस्थानं याबाबतीत कौतुकास्पद कार्य करित आहेत मात्र राजकिय पक्ष काय करित आहेत? आपले प्रमुख राजकिय पक्ष आणि मीडिया सुद्धा कोरोना महामारी आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर फोकस न करता कोण्या एका अभिनेत्याच्या आत्महत्येची ऊकल करण्यात किंवा एखाद्या अभिनेत्रीच्या मागे आपली संपूर्ण शक्ती खर्च कशी काय करत आहेत, हेच कळत नाही. सध्या नेमका आपला प्रश्न कोणता असायला हवा? कोरोना महामारीवर आपण अद्याप विजय मिळवलेला नाही. विजय मिळवल्यानंतरही या महामारीचे दिर्घकालिन परिणाम राहतील. महामारीनंतर वेगळ्याच समस्यांनी डोके वर काढलेले असेल हे यांना का समजत नाही? सध्या गरज आहे ती समाजातील गरिब आणि वंचित घटकांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्याची. त्यांना या महामारीच्या मारापासून वाचवायलाच हव.
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२
कोरोना: बेरोजगारी आणि उपासमारीचे आव्हान
More from लेखMore posts in लेख »
Be First to Comment