Press "Enter" to skip to content

” एक ही भूल “

” एक ही भूल “

 देशमुखगिरी….


( नितिन देशमुख ):  ” एक ही भूल ” हा  ए. पूर्णचंद्र राव  यांच्या लक्ष्मी प्रोडक्शन्सचा 1981 मध्ये   जितेंद्र आणि रेखा यांची भूमिका असलेला चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्यामध्ये राम ( जीतेन्द्र ) आणि साधना ( रेखा ) एक श्रीमंत विवाहित जोडपे आहेत. राम एक पदवीधर असून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी  असतो. त्याचा हातून  नशेत एक चूक घडते  त्यामुळे साधना त्याला क्षमा न करता घटस्फोट घेते. त्यावेळी ती प्रेग्नंट असते.ती मुलाला जन्म देते आणि चित्रपटात शेवटी  हा मुलगा या दोघांना एकत्र आणतो  साधना त्याला क्षमा करते असे दाखवले आहे.    
            
काही  महिन्या पूर्वीची गोष्ट कल्याण अलिबाग गाडीत नवरा बायको आपल्या अडीच वर्षाच्या मुलालाच विसरून गेले . पेणला गाडीत मुलगा एका महिलेच्या बाजूला झोपलेला होता. त्याला तिकीट नसल्याने वाहकाने त्या महिलेला त्याच्या तिकीटाचे विचारण्याचा प्रश्नच आला नाही. ती महिला कार्ले खिंडीत उतरताना मुलगा झोपला आहे . त्याला नीट घ्या म्हटल्यावर तिने हा आपला मुलगा नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या आईचा शोध सुरू झाला.  गाडीत त्याचे आई वडील नसल्याने अखेर त्याला अलिबागला वाहतूक नियंत्रकाकडे नेण्यात आले.  छान गोंडस , तरतरीत मुलगा पण त्याला काही माहिती सांगता येत नव्हती.त्याचे काय करायचे प्रश्न सगळ्यांना  पडला॰  आपली ड्यूटी संपवून घरी निघालेल्या महिला वाहक रिना इंदुलकर यांना थांबवून त्याला सांभाळण्यास  सांगण्यात आले. त्याचे आई – वडील  मुलगा सापडत नाही म्हटल्यावर पेण पोलिस  ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार करून आले . त्याच वेळी एक मुलगा अलिबागला गाडीत सापडल्याची माहिती पेण एस.टी. कंट्रोल पॉइंटला मिळाली.        
 त्याचा फोटो  पेणला  मागवण्यात आला. महिला वाहक रिना इंदुलकर यांनी व्हाटसपवर त्याचा  फोटो पाठवला. आपलाच  मुलगा असल्याची खात्री झाल्यावर आई -वडील  आणि पोलिस  आलिबागला गाडी करून निघाले. तो पर्यन्त वाहक रिना इंदुलकर यांनी तो मुलगा काहीच स्पष्ट बोलत नसला तरी शांत ही बसत  नसल्याने  त्या मुलाला चॉकलेट दे , बिस्किट दे करीत खेळत ठेवला या गडबडी अडीच तीन तास गेले. आई – वडील तिथे येताच मुलगा धावत आई जवळ गेला तिच्या ही डोळ्यात आनंदाने पाणी आले. माय लेकाचे मिलन पाहून सगळ्यांना गहिवरून आले. त्या गडबडीत मुलाला सांभाळणार्‍या वाहक रिना इंदुलकर यांचा सगळ्यांनाच विसर पडला असेल. पण यावेळी उपस्थित प्रवाश्यांनी मुलाच्या  आई -वडिलांना खूप सुनावले.  त्यांच्या ‘ एक ही भूल ‘ बद्दल त्यांना खूप ऐकावे लागले. पण शेवट गोड झाला .          
  पण लोकशाही मध्ये आपण आपला मतदानाचा हक्क न बजावल्यास आपल्या एका मताने राज्याचे किंवा देशाचे भवितव्य बदलते. राज्याची किंवा देशाची प्रगती , सुरक्षितता , देशाला जागतिक पातळीवर मिळणारा मानसन्मान या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचा प्रत्येय सध्या आपल्याला येत आहेच. अनेकांनी मतदान न केल्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षाचे सरकार , अननुभवी मुख्यमंत्री यामुळे राज्यात नोकरशाहीचा प्रभाव वाढत आहे. पण तुम्ही निवडणूकीत मतदान न करण्याची भूल केल्याबद्दल चित्रपटात ज्याप्रमाणे रामला अखेर साधना क्षमा करते त्याप्रमाणे तुम्हाला कोणी क्षमा करणार नाही की कोणाचे ऐकावे लागणार नाही उलट कोरोना लॉक डाऊनमुळे बेरोजगार झालेल्यांना वेळ घालवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या कंगना रे, कंगना रे डान्सची करमणूक उपलब्ध करण्यात आली आहे. शासकीय जहागीरदार खाजगी रुग्णालये आणि लॅब बरोबर संधान बांधून सामान्य जनतेला शासकीय रुग्णालयात जागा उपलब्ध करून देत नसल्याने खाजगी रुग्णालयाचे लाखो रुपये बिल द्यावे लागत आहे. शासकीय रुग्णालयातील अनास्थेमुळे अनेकांच्या प्रियजनांचे प्राण ही गेले आहेत. माथेरानचे आमचे पत्रकार मित्र संतोष पवार या शासकीय अनास्थे बरोबरच आपल्या ही ‘ एक ही भुलचा ‘ बळी आहे हे विसरून चालणार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.