Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान 🔷🔶🔶🔷

माथेरान नगरपरिषदे मार्फत गावातील काही भागात विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते तर शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला यावेळी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांसह आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच नगरपरिषदेचे अभियंता, कर्मचारी वर्ग, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

हॉटेल प्रीती पासून ते हॉटेल पॅनोरमा पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉक या रस्त्यासाठी ९८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, रेल्वे लाईन पासून मुस्लिम मोहल्ल्यातील भागात पावसाळी गटार करीता आठ लाख रुपये आणि मुस्लिम मोहल्ल्यात जुन्या शौचालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या जागेच्या सुशोभीकरणासाठी २३ लाख रुपयांची मोठी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. या सर्व कामाचा भूमिपूजन कार्यक्रम विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

पुढील काळात सुध्दा मोठया प्रमाणावर विकास कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरच सर्व कामे मार्गी लागणार आहेत त्यामुळे नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडचणी, समस्यांचे निराकरण होईल असे गटनेते प्रसाद सावंत यांनी यावेळी नमूद केले.आमच्या प्रभागात ही विकास कामे सुरू केल्यामुळे निश्चितच हा भाग विकसित होणार आहे त्यासाठी आम्ही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,गटनेते प्रसाद सावंत आणि सर्व लोकप्रतिनिधीचे आभारी आहोत असे या भागातील रहिवासी अनिस शेख यांनी स्पष्ट केले.

दरम्यान ही सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणावर रक्कम खर्च करण्यात येणार आहे त्यामुळे संबंधित परवानाधारक ठेकेदारांनी त्यांच्या मार्फत ही कामे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीनी निश्चित पणे या मोठया रक्कमेचा सदुपयोग करून ही कामे निदान दहा वर्षापेक्षाही अधिक काळ तरी टिकतील जेणेकरून नगरपरिषदेच्या या रक्कमेचा अपव्यय होणार नाही अशाप्रकारे पूर्ण करावीत असे स्थानिकांमधून बोलले जात आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.