सिटी बेल लाइव्ह / रायगड : अमूलकुमार जैन 🔷🔶🔷🔶
मुरुड- अलिबाग मुख्य रस्त्यावरील नांदगाव ते काशिद दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन देखिल मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी त्याकडे सातत्याने केलेल्या दुर्लक्षाचे पर्यावसन आज नांदगावच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन रास्तारोको आंदोलनात झाले.
सदरचा रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय झाला असून पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यातून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरते. शिवाय यावरुन चालत जाणार्या पादचार्यांनाही घसरुन पडणे,चिखलाने कपडे माखणे आदीसह आजारी ,वृध्द तथा स्त्रिया मुलांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे येथे सतत छोटेमोठे अपघात घडत असतात.मात्र सार्वजनिक खात्याचे अधिकार्यांनी त्याकडे अनेकदा डोळेझाकच केली आहे. येथिल ग्रामस्थांनी केलेल्या अर्ज विनंत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नांदगावच्या भवानी पाखाडी येथे काहीकाळ रास्ता रोको आंदोलन केले.
अॅड.आशिष देशपांडे,प्रतिक अरुण दळवी,मुरुड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर,ग्रामपंचायत सदस्य विक्रांत कुबल,सौ.अंकिता दळवी,विकास देशपांडे,सतिश देशपांडे,जितेंद्र पुलेकर,स्वप्निल चव्हाण,मंदार पाटील,विराज कुदुर्से,दिपेश कांबळे,विवेक चोरघे,मनिष पाटील,किशोर ढोले आदींसह अनेक ग्रामस्थांनी येथे जमून आपला संताप व्यक्त केला.
या सर्वांनी मुरुडच्या उपअभियंत्यांसह,मुरुड तहसिलदार व मुरुड पोलिस ठाणे यांना एक निवेदन देवून सदरचा रस्ता हा येत्या दहाव दिवसात दुरुस्त अथवा त्याचे नुतनीकरण न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.तसेच पावसाळ्यानंतर सदरच्या रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरणासह मजबूत डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.सदर प्रसंगी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.







Be First to Comment