Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गाच्या वाढीव भूसंपादनातील स्थानिक, शेतकरी मोबदल्यापासून वंचित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक पावित्रा : तीव्र जनआंदोलनाचा दिला इशारा 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच रस्तावाढी दरम्यान ठिकठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी यांच्या जमीनी ताब्यात घेण्यात आल्या. या प्रक्रियेत काहींचे लागवडीखालील शेतजमीन, रस्त्यालगत असलेली घरे, दुकाने भूसंपादनात घेण्यात आली. भूसंपादन केलेल्या जमिनीचा तात्काळ मोबदला देणे अपेक्षित होते, मात्र अद्यापही काही नागरिकांना घराचे तर काहींना जमीनीचे पैसे न मिळाल्याच्या तक्रारी आल्यानंतर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. सरकारने भूसंपादन प्रक्रियेतील नागरिकांना लवकरात लवकर योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा मनसे या मुद्द्यावर जनआंदोलन छेडेल असा इशारा रुपेश पाटील यांनी दिला आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काही गावांची जमीन सरकार कडून मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आली आहे. परंतु वाढीव रस्त्यासाठी गेलेल्या जमीनीचे काही लोकांना घराचे तर काहींना जमीनीचे पैसे न मिळाल्याने जनता त्रस्त झाली आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून जनतेने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे दाद मागितली आहे. हा सर्व प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती रुपेश पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान रस्ता वाढीसाठी झालेल्या भूसंपादनात ज्या नागरिकांना अजूनही मोबदला मिळाला नाही त्यांनी रुपेश पाटील (9271718288) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.