सिटी बेल लाइव्ह / कळंबोली /प्रतिनिधी 🔷🔶🔷🔶
कळंबोली नागरी वसाहतीतील समस्यांना सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार आहे. रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर टाकलेल्या खडीने नागरिकांना अपघात होत आहेत तर सततच्या चेंबर जाम होवून मल मिश्रित पाण्याने नागरिक नरक यातना भोगत आहेत. मान्सुनपुर्व सर्व कामे ठेकेदार व सिडको अधिकारी फस्त करत असल्याने़ येथे सिडको प्रशासनाकडून ठेकेदाराला अभय तर जनतेला वेठीस धरले जात आहे. यामुळे कळंबोली कर त्रस्त झाले आहेत.
सिडकोच्या या जाणूनबुजून दुर्लक्षक्षितपणामुळे स्वच्छ भारत अभियानाचा बट्याबोल झाला आहे.
कळंबोली वसाहत विकसित करताना सिडकोने तांत्रिक बाबीकडे लक्ष न दिल्याने ही वसाहत समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली उभी केली आहे. त्यामुळे के एल ४ व ५ मधील रहिवाशीच्या घरात शौचालयातून सतत मलनि:स्सारण विहिनाचे घाण पाणी येत आहे. परिणामी या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घरात शिरत असलेले घाण पाणी काढण्यासाठी सिडकोने गेली वीस वर्षापासून दोन चेंबरवर पंप लावले आहेत. पण त्यांना हे पाणी काढण्यासाठी त्यांनी कोणतीही उपाय योजना केली नाही. कमी पावसातही कळंबोलीत पाणीच पाणी होते. त्यामुळे . केएल ५ई , ४ ई व एसबीआय चौका सह बहुतेक वसाहतीत सर्व चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे.
कोरोना महामारीचा पुरेपूर फायदा उठवत कळंबोली सिडकोकडून मान्सुनपुर्व कामे करण्यात न आल्याने शहरातील रस्ते, गटारे, नाले, व पदपथची दुरावस्था झाली आहे शहरातील एकमेव मुख्य रस्ता बनविण्यात आला आहे तोही निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आल्याने अनेक ठिकाणी खड्ड्यात गेला आहे.
या रस्त्यावर मच्छी मार्केट जवळ मोठा खड्डा पडला असून त्यात टाकण्यात आलेल्या खडीने अनेक अपघात झाले आहेत. वाहनाने खड्डी उडत असल्याने पायी चालणा-या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत असून डोळे गमावण्याची भिती वाटत आहे. गटारे, नाल्याची सफाई करण्यात न आल्याने थोड्या पावसातही शहरात पाणी भरत आहे यावर्षी सिडको अधिका-याच्या मदतीला कोरोना धावून आल्याने त्यांचा चांगलाच फायदा करून घेतल्याचे शहरातील समस्यावरून दिसून येते.
“कळंबोली वसाहत म्हणजे समस्यांचे माहेरघरच आहे. सिडकोकडून दरवर्षी मान्सुनपुर्व रस्ते दुरुस्ती, नाळे, गटारे साफसफाई करण्यात येत पण ती यावर्षी करण्यात न आल्याने शहरातील रस्ते खड्यात गेले आहेत. तर काही रस्त्याना फक्त खड्डी टाकण्याचे काम सिडकोकडून करण्यात आले. कोरोनामुळे लोकं बाहेर पडली नसल्याने गटारे, नाले तुंबून शहरात पसरलेल्या पाण्याचा नागरिकांना सामना करावा लागला नाही. कळंबोली करांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. खड्डे आणि त्यात सांडपाणी यातून मार्ग काढावा लागतो. हीच सिडकोची स्मार्ट सिटी आहे का असा प्रश्न पडतो. वारंवार तक्रार करूनही सिडको अधिकारी डोळेझाक करीत आहेत.
येथे ठेकेदाराला जावई करताना जनतेला वेठीस धरले जात आहे. येथील बिकट परिस्थितीला सर्वस्वी येथील सिडको प्रशासन जबाबदार असल्याची तीव्र प्रतिक्रिया जनतेतुन व्यक्त केली जाते.







Be First to Comment