प्रा.डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण यांना विधान परिषद सदस्य म्हणून राज्यपालाद्वारे नियुक्त करण्याची मागणी 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠
राजकीय पटलावर ज्या समाजाला स्थान नाही त्या समाजाला विकासाच्या प्रवाहाबरोबर जाणं कठीण होत आहे. याची प्रचीती महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या लोकांना येत आहे. अत्यंत कष्टप्रद जीवन जगणाऱ्या या नंदीवाले या समाजाला स्वातंत्र्योत्तर काळानंतर विधान परिषदेवर प्रतिनिधीत्वाची संधी मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे.
नंदीवाले या भटक्या समाजातील प्रा.डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण यांची नेमणूक करावी अशी मागणी राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांचेकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे. रोजच्या जगण्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक समस्या दिवसेंदिवस गडद.होत आहेत. या समाजाचा सर्वच पातळीवर विकास खुंटला आहे. अन्य जाती-जमातीच्या लोकांना विधानसभा व विधान परिषद मध्ये संधी मिळाली आहे.
प्रा.डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण ‘महाराष्ट्रातील नंदीवाले समाज: संस्कृती व साहित्य’ या विषयावरील प्रबंध सादर करुन शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी तसेच रामोशी समाजाविषयी प्रबंध सादर करुन एम.फिल. पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
पीएच.डी. व एम.फिल. च्या विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ म्हणून नांदेड विद्यापीठाने त्यांचे ४ ग्रंथ लावले आहेत. सध्या ते आशिया खंडातील एक नावाजलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी.पी.भोसले महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्रामध्ये नंदीवाले ही जात भटक्या जमातीमध्ये समाविष्ट असून नंदीवाले समाज हा महाराष्ट्र भर व अन्य राज्यातही विखुरला आहे. हा समाज आजही पोटाच्या उदरनिर्वाहासाठी नंदीबैल घेऊन कुटुंबासह या गावाहून त्या गावाला भटकंतीचे जीणे जगत आहे. या समाजातील महिलाही डोक्यावर सुया-दोन्याबरोबर फणी काळे मणी, चाप, पिना, पंचरंगी व काळा दोरा, तांब्या-पितळ्याचे वाळे, बिब्बे, दाबण तसेच भांडी विक्रीचा बुट्टा घेऊन दारोदारी भटकत आहेत. त्याचबरोबर ‘गंगोदक’ व वेगवेगळ्या देवदेवतांच्या मुर्त्या, फोटो विक्रीचा व्यवसायही करीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीनुसार पर्यायी व्यवसाय करुन आजही हा समाज अठरा विश्व दारिद्यात भटकंतीचा भोग भोगत आहे. या समाजासह भटक्या विमुक्त समाजाच्या उद्धारासाठी राज्यपाल महोदयांनी या मागणीचा प्रामुख्याने विचार करावा अशी मागणी होत आहे.
सदर नियुक्तीसाठी लागणारे निकष आमचा समाज पूर्ण करु शकत नव्हता. सध्या काळानुरुप आमच्या समाजातील उच्च विद्याविभूषीत प्रा.डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण या व्यक्तीने विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळण्याच्या दृष्टीने सर्व कौशल्ये आत्मसात केली असून गेली २८ वर्षे ४७ भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी, न्याय-हक्कासाठी व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आजही त्यांचे भटक्या-विमुक्तांच्या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. असे नंदीवाले समाज अध्यक्ष अर्जुन पवार यांनी सांगितले.







Be First to Comment