Press "Enter" to skip to content

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी स्वाती कदम

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या (महाराष्ट्र्र राज्य) रायगड जिल्हाध्यक्षपदी स्वाती सदानंद कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वाती कदम यांचे पर्यावरण संरक्षण, संवर्धन व तत्ससंबंधी केलेली जनजागृती व वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन संस्थेचे राज्याध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब राजाराम मोरे यांनी नुकतेच स्वाती कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

सबंध रायगड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन विषयक धोरणांना घेऊन अधिक प्रभावीपणे विविधांगी उपक्रम राबवावेत, व संस्थेच्या माध्यमातून तळागाळात पर्यावरण संवर्धन व संरक्षण या विषयावर जनजागृती घडवून आणावी अशा शुभेच्छा यावेळी आबासाहेब मोरे यांनी दिल्या. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे काम गाव, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर व्यापक स्वरूपात सुरू असून सन 2020-25 या काळात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचे मोठे उद्दीष्ट असल्याचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी स्पष्ट केले.

मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी संस्था कार्यरत आहे. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशातच पर्यावरण संरक्षण व संवर्धन काळाची गरज असून याकामी प्रत्येक नागरिकाने कर्तव्ये जबाबदारी स्वीकारून योगदान देणे गरजेचे आहे.

संस्थेने मोठ्या विश्वासाने सोपवलेल्या पदाची जबाबदारी ओळखून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे काम करणार असल्याची ग्वाही स्वाती कदम यांनी दिली. स्वाती कदम यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्यांचे मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बाळासाहेब कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.