राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांच्या पत्राची दखल 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबईचे निरीक्षक प्रशांत पाटील यांनी भेट घेऊन उरणच्या उपजिल्हा रुग्णालय व जेएनपीटी कोविड हॉस्पिटल संदर्भात तक्रारी सांगून त्या दूर करण्यास सांगितले. याची दखल घेत त्या मार्गी लावण्याचे टोपे यांनी सूतोवाच दिले.
आज सकाळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांची भेट घेऊन शासनाने १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व डॉक्टर, कर्मचारी निवासी इमारत बांधण्यासाठी भूखंड क्रमांक १ सेक्टर १५ ए, द्रोणागिरी नोडमध्ये २०१३ साली मंजुरी देण्यात आली होती.
या भूखंडाचे शासनाने ८४,१४,००० रुपये सिडकोला वर्ग करण्यात आले आहेत. विलंब झाल्यामुळे सिडकोला विलंब शुल्क ४,४५, ३५६ रुपये व इतर शुल्क ३,०५,६९० रुपये भरणे बाकी असल्याने सिडकोने भूखंडाचा ताबा दिला नाही. तसेच विलंब शुल्क माफ करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
तालुक्यातील कंपन्यांमधून सीएसआर फंडातून हॉस्पिटल बांधण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती. सदर हॉस्पिटलची जबाबदारी उपसंचालक आरोग्य सेवा मुबंई मंडळ सिव्हिल सर्जन अलिबाग यांच्याकडे सोपविली होती. तरीही उरण उपजिल्हा हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणताच संबंधित अधिकाऱ्यां बरोबर बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत.
जेएनपीटी कोव्हिड १९ रुग्णालयाच्या बाबत तक्रारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जेएनपीटीने मोफत उपचार व १०० ऑक्सिजन बेड तयार करावेत अशी सुचना केल्यावर त्वरित याची दखल घेत राजेश टोपे यांनी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत मोफत उपचार व १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
उरणच्या जनतेला भेडसावणाऱ्या उपजिल्हा हॉस्पिटल व कोव्हिड हॉस्पिटलमधील मोफत उपचार हे प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.






Be First to Comment