जिप सदस्या कुंदा ठाकूर व माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याचे समजताच धक्काच बसला असून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. परंतु खरोखरच संतोष पवार यांना न्याय मिळेल का असा सवाल उपस्थित होत आहे. तरी अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेडसहित कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्याची नितांत गरज असल्याचे जिप सदस्या कुंदा ठाकूर व माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी सांगितले.
एक अजातशत्रू, दिलखुलास, समाजहितासाठी सतत लढणारा पत्रकार म्हणून श्री. संतोष पवार यांची एक चांगली ओळख होती. मात्र अशा चांगल्या व्यक्तीचे आपल्यातून असे अचानक जाण्याने जिल्ह्याची आणि प्रसारमाध्यम क्षेत्राची हानी झाली आहे.
काल त्यांना कर्जत तालुक्यात ऑक्सिजन बेड नसल्याकारणाने संतोष पवार यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईत हलविण्यात येत होते. त्यावेळी त्यांना ऑक्सिजन पुरविणारा सिलेंडर संपल्याने दुसरा ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात येत होते, त्यावेळी अंब्युलन्समध्ये असलेल्या डॉक्टरांना हा ऑक्सिजन सिलेंडर लावता न आल्याने काही क्षणातच संतोष पवार यांना मृत्यूने गाठले.
परंतु त्यावेळी खरोखरच डॉक्टर बरोबर होते का? तसेच जर असतील तर त्यांना ऑक्सिजन सिलेंडर लावाता येत नसेल तर असले नवखे अप्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक करून शासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असे वाटते. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, हे चांगले झाले. परंतु अशा घटना जिल्ह्यात वारंवार घडत असल्याची चर्चा मग याबाबत शासन ठोस उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचे वाटते.
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाग्रस्तावर उपचार करताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील किती तालुक्यांना प्रत्यक्ष भेटू देऊन पाहणी केली हे गुलदस्त्यातच आहे. तरी त्यांनी प्रत्यक्ष प्रत्येक तालुक्याला भेट देऊन कोरोना बाधितांची पहाणी केली तरच त्यांना तेथील सुविधांचा अभाव दिसून येईल.
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असून सर्व शिपाई पासून डॉक्टर पर्यंतची भूमिका त्यांना निभवावी लागत आहे. तसेच त्याठिकाणी अंब्युलन्सचीही सोय नाही. जर एखादी घटना घडली तर कसे होईल अशी बिकट अवस्था आहे. उरणमध्ये अनेक घटनासह कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतानाही पालकमंत्री आदतीती तटकरे या उरणमध्ये एकदाही भेट देऊ शकले नाहीत. तरी त्यांनी उरणला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी उरणकरांची मागणी आहे. तसेच जे कोरोनामध्ये तळागाळात काम करतात अशा सर्वांना ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवण्यात यावे जेणेकरून संतोष पवार सारख्या घटना टाळता येतील असेही ठाकूर यांनी सांगितले.
संतोष पवार यांच्यासारख्या घटना आणखीन घडू नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सिज बेडसह कोविद हॉस्पिटलची निर्मिती केलीतर अनेकांचे जीव वाचून कोरोनावर मात करणे शक्य होईल. तसेच संतोष पवार त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना त्वरित सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तरच ही संतोष पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा विश्वास जिप सदस्या कुंदा ठाकूर व माजी जिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.






Be First to Comment