Press "Enter" to skip to content

पाली ग्रामीण रुग्णालय होण्यासंदर्भातील बैठकिला तारीख पे तारीख….!

पालकमंत्र्यांनी पुन्हा बैठक पुढे ढकलली..🔶🔷🔶🔷

समाधानकारक व ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा जनआंदोलन : ह भ प महेश पोंगडे महाराज यांचा इशारा 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔷🔶

सुधागड तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने येथील आरोग्य सेवासुविधा अपुऱ्या पडत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने आजवर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ग्रामीण रुग्णालयाची थोरवी गात विविध राजकीय  पक्षाने बडे बडे  कार्यक्रम घेत भूमिपूजन केलेल्या जागेवर आजतागायत एकही वीट न रचल्याने सुधागडवासीय जनतेने संताप व्यक्त केला आहे. 

पालीत ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश पोंगडे महाराज व इतरांनी स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन केले होते. यावेळी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे यांनी 29 व 30 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे त्यांच्या दालनात संबधीत अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित करून ग्रामीण रुग्णालय संदर्भातील बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही बैठक पुढे ढकलून 10 सप्टेंबरला होणार होती. मात्र आता ही बैठक देखील पुढे ढकलली असून आता 14 सप्टेंबर ला बैठक होणार आहे. आणि तीही मंत्रालयात न होता जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे होणार आहे. असे महेश पोंगडे महाराज यांनी सांगितले.

दिलेल्या आश्वासनाप्रमाणे समाधानकारक  व  ठोस निर्णय न झाल्यास  ग्रामीण रुग्णालयाच्या  प्रश्नावर पुन्हा आंदोलन  छेडणार असल्याचा इशारा ह भ प महेश पोंगडे महाराज यांनी  दिला आहे. एकंदरीतच या सर्व परिस्थितीवरून  जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील प्रश्न व विषयाबद्दल प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची  चर्चा सुधागड तालुक्यात सर्वत्र  होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.