Press "Enter" to skip to content

पनवेल तहसील कार्यालयात नागरिकांची कामे होत नसल्याची ओरड

भाजपा ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष एकनाथ देशकर यांचा आरोप

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔷🔶🔷🔶

कोरोना काळातील लॉक डाऊन संपुष्टात आणून सध्या शासनाने अन लॉक डाऊन सुरू केले आहे.मिशन बिगिन अगेन अंतर्गत सध्या अनलॉक डाऊन चे चौथे चरण सुरू आहे.विविध दाखल्यांसाठी रखडलेल्या नागरिकांनी आता लगबग सुरू केली असली तरी कार्यालयातील अनुपस्थिती मुळे नागरिकांची कामे होत नसल्याने प्रचंड नाराजी असल्याचा आरोप भाजपा ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष एकनाथ देशेकर यांनी केला आहे.

पनवेल तहसिल कार्यालयात सध्या कर्मचारी आणि तहसीलदार अनुपस्थित असल्याचे प्रमाण वाढले आहे. देशेकर पुढे म्हणाले की, कित्येक व्यवहार अथवा दाखल्यांच्या कामी खुद्द तहसीलदार यांच्या अंगठ्याचे इम्प्रेशन आवश्यक असते.कोरोना महामारी च्या कालखंडात सर्वच्या सर्व कर्मचारी उपलब्ध राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आम्ही देखील जाणतो, परंतु अशा परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या दाखले तथा अन्य कामांचे बाबत जबाबदार व्यक्ती कोण याची माहिती फलकावर लावणे गरजेचे आहे.परंतु तहसील कार्यालयात केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत दरवाजे बंद केले जातात.

तालुक्याभरात सध्या शेतीची कामे देखील तितक्याच जोमाने सुरू आहेत.त्याही परिस्थितीत गरीब गरजू तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. अशा नागरिकांना अजिबात मार्गदर्शन मिळत नाही. या कार्यालयात खेटे घालून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना जर फर मारावे लागत असतील, सामान्य माणसाचे हाल काय वर्णावे ?

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगीन अगेन जरी सुरू केले असले तरी या मिशनमध्ये पनवेलचे तहसीलदार कार्यालय सहभागी नाही का ? असा उद्विग्न सवाल यावेळी एकनाथ देशेकर यांनी उपस्थित केला.

देशेकर यांनी केलेल्या आरोपांचे बाबत आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार कार्यालयात भेट दिली असता रामकृष्ण दत्तू वाढवणे यांनी आपली कैफियत मांडली.ते कामोठे येथील रहिवासी असून मार्च महिन्यापासून उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी खेटे घालत आहेत.आज या उद्या या अशी उडवाउडवी ची उत्तरे त्यांना मिळत असून ते अद्यापही दाखल्याच्या प्रतीक्षेत आहेत. सदर दाखला त्यांना मुलीच्या शैक्षणिक कामासाठी हवा असून आजपर्यंत भोगलेल्या त्रासाचे वर्णन करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.