भूमिपुत्रांच्या इशाऱ्या नंतर जे एन पी टी व्यवस्थापन ताळ्यावर : रुग्णांना मोफत उपचार देण्याचे आश्वासन !🔶🔷🔷🔶
कोविड रुग्नांकडून उपचार खर्च उकळण्याचे परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन ! 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील यांजकडून )🔷🔶🔶🔷
जेएनपीटी बंदर प्रशासनाने कालच्या सोमवारी काढलेले परिपत्रक आजच्या मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाठीमागे घ्यायला लावण्याची ताकद उरणच्या भूमिपुत्रांनी दाखऊन दिली आहे! भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी आज तातडीने जेएनपीटी प्रशासन भवनाला धडक देत जेएनपीटीने कोविड रुग्णांना उपचार करण्याबाबत आकारण्यात आलेल्या फी बाबतचे परिपत्रक मागे घ्यायला लावले आहे .
याकामी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत जे एन पी टी बंदराचे कामगारांतून निवडून आलेले विश्वस्त दिनेश पाटील आणि भूषण पाटील सर्वात जास्त आघाडीवर असल्याचे दिसून आले. आत्तापर्यंत तालुक्यातील कोविड रुग्नांवर जे एन पी टी कोविड सेंटरमध्ये ज्याप्रमाणे मोफत उपचार सुरू आहेत तेच याहीपुढे सुरूच राहणार असल्याची गवाही यानिमित्ताने जे एन पी टी चे कार्यालयीन व्यवस्थापक जयवंत ढवळे यांनी जाहीर केले आहे.
त्याचबरोबर सर्व कामगार संघटना एकत्र येत जे एन पी टी वसाहतीतील कामगारांच्या घर भाड्याची वाढविण्यात आलेली भाडे रक्कम ही स्थगित करण्यात यश मिळविले असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
भाजपा वगळून सर्वपक्षीयांनी केलेल्या या आंदोलनात माजी आमदार मनोहरशेठ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील , विश्वस्त दिनेश पाटील आणि भूषण पाटील , माजी विश्वस्त रवींद्र पाटील , उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत , कामगार नेते महादेव घरत , ऍड विजय पाटील , आगरी कवी भूषण एल. बी . पाटील , यांच्यासह सीमा घरत , भावना घाणेकर , दीपक नाईक , रमेश पाटील आदी नेते मंडळी या दे धडक आंदोलनात सहभागी झाली होती. या निमित्ताने उरणकरांच्या अस्मितेचा प्रश्न असतानाही या प्रश्नांची दखल न घेणारे उरणचे आमदार भाजपाचे महेश बालदी यांचा सर्वानुमते निषेध करण्यात आला.

स्थानिक भूमिपुत्रांच्या निस्सिम त्यागावर उभ्या राहिलेल्या आणि वर्षाकाठी कोट्यवधींचा महसूल कमावणाऱ्या जे एन पी टी बंदर प्रशासनाने अगदी कोरोना महामारीच्या काळात स्थानिकांवर अक्षरशः टांग टाकण्याचे काम कालच्या सोमवारी केले होते . आत्तापर्यंत कोरोना रुगणांवर मोफत उपचार करणाऱ्या जे एन पी टी बंदराने आपल्या कामगारां व्यक्तींरिक्त येणाऱ्या बाहेरील रुग्णांना दिवसाकाठी थेट ५३०० रुपये आकारणार असल्याचे परिपत्रकच काल काढले होते . तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला कोरोना महामारीच्या निमित्ताने जे एन पी टी च्या कोविड रुग्णालयात दाखल करताना किमान २५ हजार रुपये ऍडव्हांस म्हणून भरावे लागणार असल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.
बंदराने सुमारे दहा दिवसांचा रुग्नाचा मुक्काम गृहीत धरून त्याच्या ५३ हजारांपैकी अर्धी रक्कम म्हणजेच २५ हजार रुपये रुग्नाला घेऊन येणाऱ्या नातेवाईकाने रुग्णालयाच्या काऊंटरवर जमा करण्याचे फर्मानच या निमित्ताने काढले होते . त्यामुळे ऐन कोरोनाच्या महामारीत केंद्र सरकारच्या हाती असलेल्या जेएनपीटी बंदराने स्थानिकांवर खऱ्या सुरा खुपसल्याची भावना स्थानिकांची झाली होती .

बंदराच्या माध्यमातून काढण्यात आलेले हे परिपत्रक स्थानिक सोशल मीडियावर कालच पोहोचताच त्यावर कडकडीत प्रतिक्रिया आल्या होत्या .आपल्याकडील कोट्यवधींचा सी एस आर फंड राज्यातल्या नागपूर आणि इतर भागात अगदी महा प्रसादासारखा बेछूट वाटणाऱ्या जे एन पी टी प्रशासनाने कोरोनाच्या माहामारीत स्थानिकांच्या भळाळत्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याची खदखद स्थानिकांमध्ये होती त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळी बंदराच्या प्रशासन भवनांवर स्थानिकांनी धडक दिली .

यावेळी स्थानिकांचा रुद्रावतार पाहून जे एन पी टी व्यवस्थापनाला नमते घेऊन स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत बैठक घ्यावी लागली या बैठकीत रुग्नांवर आकारल्या जाणाऱ्या उपचार खर्चा बाबतचे परिपत्र चेअरमन यांच्याशी चर्चा करून मागे घेणार असल्याचे जयवंत ढवळे यांनी जाहीर केले आहे. सुरुवातीला या चर्चेत जे एन पी टी चे उपाध्यक्ष श्री वाघ सहभागी झाले होते मात्र स्थानिकांशी झालेल्या खडाजंगी नंतर त्यांनी सभात्याग केला त्यानंतर जयवंत ढवळे यांनी मध्यस्ती करून त्यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला आहे. यावेळी संतप्त स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रकल्पग्रस्ताच्या आणि स्थानिकांच्या वाकड्यात जाल तर गाठ भूमिपुत्रांशी असल्याचागर्भित इशाराच या निमित्ताने दिला आहे






Be First to Comment