Press "Enter" to skip to content

आदर्श शिक्षक मुख्याध्यापक भास्कर थोरवे ह्यांचा वंजारी समाजातर्फे सत्कार


सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड)🔷🔶🔶🔷


जिल्हा परिषद रायगड येथील उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांचेकडे प्राप्त झाला असता जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा निवड समितीने कर्जत तालुक्यातील नेरळ येथील कन्या शाळा नं.2 चे पदोन्नती मुख्याध्यापक भास्कर मुरलीधर थोरवे ह्यांना जाहिर केल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

नेरळ कन्या शाळा नं.2 येथे कार्यरत असलेले पदोन्नती मुख्याध्यापक भास्कर मुरलीधर थोरवे ह्यांनी 1995 साली प्रथमतः आदिवासी भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या कशेळे येथील शाळेद्वारे शैक्षणिक सेवेस ख-या अर्थाने प्रारंभ केला. त्यावेळी त्यांच्याकडे इयत्ता सातवीच्या वर्गाची जबाबदारी देण्यात आली. सुरुवातीपासुनच शिक्षणाची आवड असलेल्या थोरवे गुरूजींनी विद्यार्थ्यांच्या मनावरही शिक्षणाचे महत्त्व बिंबवले आणि ते शिकवत असलेल्या इयत्ता सातवीच्या वर्गातील कु.‌रेखा ठोंबरे ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरीट मध्ये उत्तीर्ण होऊन तीला शिष्यवृत्ती मिळाली. अशाप्रकारे त्यांच्या शिकवणीचा सकारात्मक परिणाम दिसुन आला.

2016 साली त्यांची बदली खालापुर तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील राजिप शाळेत झाली असता त्यांनी हरिओम चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्यातुन सुमारे वीस लाख रुपये निधी मिळवुन शाळेच्या भौतिक सुविधांची कामे करवुन घेतली. त्याचबरोबर क्रिडास्पर्धेत खालापुर तालुक्यात प्रथम व जिल्हा स्तरावर अंतीम फेरीपर्यंत शाळेचा संघ खेळवण्यास अपार मेहनत घेतली. राजिप शाळा कशेळे येथुन राजिप शाळा कर्जत नं. 1 येथे बदली होऊन आल्यानंतर त्यांनी कर्जत शहरातील शाळाबाह्य व झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांना शासकीय योजनांचा सर्व लाभ मिळवुन दिला. आजमितिस राजिप कर्जत शाळा नं. 1येथे त्यांच्या देखरेखीखाली शिकलेले अनेक विद्यार्थी समाजात सन्मानाने आपले जीवन जगत आहेत. राजिप शाळा दहिवली नीड व कोषाणे येथील शाळांमध्ये देखील त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाला साजेसे असे कार्य केले.

त्याचबरोबर सद्य परिस्थितीत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन जनजागृती, समाज प्रबोधन, मदतकार्य तसेच रुग्णांना सहकार्य करण्याचे कामही ते करत आहेत. शिवाय ह्याच कालावधीत त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद सेस फंडातुन शाळेच्या इमारतीवर पत्र्याचे शेड उभारून सुंदर असे सभागृह तयार करुन घेतले. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, त्यांनी शिस्तीत रहावे आणि योग्य शिक्षण घेऊन जगासमोर उभं राहावं तसेच भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उंचावले जावे अशा प्रामाणिक हेतुने विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या पदोन्नती मुख्याध्यापक भास्कर मुरलीधर थोरवे ह्यांचा कर्जत तालुका वंजारी समाजातर्फे सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी कर्जत तालुका वंजारी समाजाचे उपाध्यक्ष मधुकर गंगावणे, सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक गंगावणे, दत्ता गंगावणे, ओमकार पवार, अंकुश गंगावणे, प्रशांत पवार, सुशिल पवार, किरण गंगावणे, गणेश पवार, गणेश ओंबासे, माणिक थोरवे, ज्ञानेश्वर थोरवे, प्रमोद थोरवे, प्रभाकर गंगावणे आदि वंजारी समाज बांधव उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक यांच्या सहकार्यातुन शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले. वर्गखोल्या व स्वच्छतागृहांची बांधकामे सर्व शिक्षा अभियानांतर्गत करवुन घेतली. राजिप शाळा कोषाणे येथील 80% आदिवासी विद्यार्थ्यांचा विचार करुन इयत्ता आठवीचा नविन वर्ग सुरू केला. येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. विकासाचा ध्यास मनी असलेल्या थोरवे सरांनी सन 2019 रोजी नेरळ येथील कन्या शाळा नं. 2 चा पदभार स्विकारल्यानंतर शालेय गुणवत्ता, 100% उपस्थिती, कवायत, योगासने, बालसभा असे विविध उपक्रम राबविले. पालक सभा, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने शाळेत डिजिटल वर्ग, संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन वर्ग, वृक्षारोपण तसेच विविध शैक्षणिक शिष्यवृत्तीची प्रभाविपणे अंमलबजावणी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.