Press "Enter" to skip to content

रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन विरोधात भूमिपुत्रांचा लढा

माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

बी.जी.कोळसे पाटील काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष 

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन  यांच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त शेतकरी यांनी प्रखरपणे लढा उभारला आहे. या लढ्याचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, लढवय्ये नेते  बी.जी.कोळसे पाटील हे करीत आहेत. बी.जी. कोळसे पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत हाती घेतलेले सामाजिक व कामगारांचे  प्रत्येक आंदोलन यशस्वी केले आहे. 

प्रकल्पग्रस्तांची न्यायालयीन बाजू व लढ्याचे नेतृत्व अत्यंत अनुभवी, अभ्यासू , व माजी न्यायमूर्ती करीत असल्याने या  आंदोलनाला अधिक महत्व तसेच प्रचंड बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे, शिवाय प्रकल्पग्रस्तांचा आत्मविश्वास देखील द्विगुणित झाला आहे.  माजी न्यायमूर्ती  बी.जी.कोळसे पाटील  यांच्या उपस्थितीत  मंगळवार दि. (८)  रोजी ठीक सकाळी ७:३० वा. कडसुरे बस स्टॉप या ठिकाणी प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त , कंत्राटी कामगार, कायमस्वरूपी कामगार, व सेवानिवृत्त कामगार, तसेच सुशिक्षित बेरोजगार यांच्या उपस्थितीत जोडेमारो आंदोलन होणार असल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

सलग तीन दिवस प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त रॅली काढून गाववाड्या पाड्यात जाऊन या आंदोलनाबाबत अधिक जनजागृती व प्रसार करीत आहेत. त्यामुळे कडसुरे येथे होणारे जोडेमारो आंदोलन भव्य असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. किमान  ३६ वर्ष प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.  पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स कंपनीने  601 प्राधान्य प्रमाणपत्र धारक, 110 नलिकाग्रस्त प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, कंत्राटी कामगारांना समान काम व समान वेतन व सर्व सुखसुविधा देणे, कायमस्वरूपी कामगारांचे वय 58 ऐवजी 60 वर्ष करावे आदींसह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनाला माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील उपस्थित राहणार असून ते प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करणार आहेत. या आंदोलनादरम्यान ते काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.