
सुधागडात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे गुणवत्ताधारक शिक्षक ! मात्र यंदा ठरले राजकारणाचे बळी 🔷🔶🔷🔶
शिक्षक संघटनांसह शिक्षक वर्गात नाराजी व संतापाची लाट 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠
भारत देशाचे महान सुपुत्र, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर जन्मदिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेमार्फत विविध तालुक्यातील 15 प्राथमिक व 15 माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिला आहे.
खरे तर सुधागडात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे गुणवत्ताधारक, उपक्रमशील प्राथमिक शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत 14 तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा समावेश आहे,तर सुधागड तालुक्यातील एकाही शिक्षकाचे नाव यामध्ये समाविष्ट नसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच स्थानिक राजकारणामुळे येथील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत शिक्षक संघटनांसह शिक्षक वर्गातून याबाबत नाराजी व संताप व्यक्त होताना दिसतोय.
पुरस्काराने प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र घडते हे खरे असले तरी आजमितीस पुरस्कारांचे हे स्वरूप बदलले असल्याचे दिसते. वशिलेबाजी, हाजिहाजी, राजकारण्यांची मर्जी राखली की पुरस्कारावर शिक्कामोर्तब होते असे आता काही अंशी शिक्कामोर्तब झाले आहे. सुधागड तालुक्यात एकही आदर्श शिक्षक नाही का ? असेल तर पुरस्कारापासून वंचित का ?राजकारणाचा शिक्षक बळी का ठरावा ? शिक्षकांच्या नावाची पंचायत समितीने योग्यरीत्या शिफारस केली की नाही ? जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा निवड समितीने प्रस्तावित केलेल्या यादीत सुधागडचा समावेश का नाही ? असे अनेक सवाल यानिमित्ताने आता उपस्थित होताना दिसत आहेत. तर या मुद्द्यावर सुधागड सह जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून या बेरकी राजकारणातील मुख्य सूत्रधार शोधून त्याचा बुरखा फाडण्यासाठी शिक्षक संघटनांनी दंड थोपटल्याचे दिसते.
पाली सुधागड सह उरण, खालापूर, तळा,रोहा आदी पाच तालुक्यात आदर्श शिक्षक पुरस्कार बाबत बोंबाबोंब झाली आहे. येथील शिक्षक स्थानिक राजकारणाचे बळी ठरल्याचे सांगितले जाते. दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून किमान तीन शिक्षकांचे प्रस्ताव (दोन पुरुष व एक स्त्री, )जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येतात. सदर प्रस्तावात शिक्षकांचे अध्यापन, शैक्षणिक पात्रता, अनुभव, शैक्षणिक सामाजिक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, साहित्य लेखन, शालेय निकाल, शिस्त व शालेय प्रगती, तसेच मागील पाच वर्षांचा गोपनीय अहवालातील प्रगतीचे एकूण निकष आदींचा विचारविनिमय केला जातो. तालुका पातळीवरून शिक्षकांचे प्रस्ताव योग्य रित्या पाठविणे गरजेचे असते.अशात सुधागड तालुक्यात यावर्षी शिक्षकांचे पुरस्कारासाठी अहवाल व प्रस्ताव कशा पद्धतीने पाठविले, असे सवाल उठत असून सुधागड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिला याची मनोमन खंत प्रत्येक शिक्षकाला व प्रत्येक सुधागड वासीय नागरिकाला वाटत आहे. सुधागड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित का राहिला , यास जबाबदार कोण ? हे लवकरच स्पष्ट होईल व त्यास शिक्षकांच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागेल हे निश्चित.







Be First to Comment