Press "Enter" to skip to content

टिळक खाडे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार)🔷🔶🔷🔶


सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी या शाळेचे उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. टिळक खाडे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे ‘ आदर्श शिक्षक ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते अक्षय नागोठणेकर , रोहित राऊत आणि ओमकार लाड यांनी टिळक खाडे यांना हा पुरस्कार प्रदान केला.

टिळक खाडे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ते दहावीला अध्यापन करत असलेल्या गणित व विज्ञान विषयाचा दरवर्षी शंभर टक्के निकाल लागतो. विज्ञान प्रदर्शनात व विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. करिअर संदर्भात ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. व्याख्यानातून ते सामाजिक प्रबोधनाचे काम करत आहेत. विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते विविध वृत्तपत्रांतून लेखन करत आहेत.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. कोरोना व लाॅकडाऊन काळात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या ‘ शोधा , खेळा व शिका ‘ ह्या वैज्ञानिक उपक्रमाची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने दखल घेतली आहे. ते अध्यक्ष असलेल्या ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.अशा उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल टिळक खाडे यांचे सु.ए.सो.चे अध्यक्ष वसंतराव ओसवाल , उपाध्यक्ष रविंद्र लिमये , सचिव रविकांत घोसाळकर , स्थानिक शाळा समिती अध्यक्ष मधुकरराव ठमके , मुख्याध्यापक एल्.एल्. ठाकरे तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.