माझ्या जडणघडणीत आई रुपी गुरू ची भूमिका महत्त्वाची : अदिती तटकरे 🔶🔷🔷🔶
रायगड जिल्हात श्रीवर्धन शिक्षणाचे केंद्र बिंदू बनेल 🌟💠🌟💠
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते 🔷🔶🔶🔷
व्यक्ति विकासामध्ये गुरूची भूमिका निर्णायक असते. आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती, सुखदुःख, यश अपयश सर्वांना सामोरे जाण्याचे धैर्य, सामर्थ्य, विवेकशीलता, निर्णय क्षमता या सर्व बाबींचा विकास करण्यासाठी गुरु रुपी वाटाड्या, मार्गदर्शक महत्त्वाचा असतो. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आई रुपी गुरुचे महत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे. असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धन मधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शनिवारी तेजस्विनी व सरस्वती पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. अदिती तटकरे यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्यात मनोगत व्यक्त करत असताना अदिती तटकरे यांनी सांगितले. आपले जीवन संघर्षाने भरलेले आहे. व्यक्तीचे वर्तन, त्याची स्वप्न, त्याच्या इच्छा-आकांक्षा यांना योग्य आकार देण्याचे काम गुरु करतो. माझ्या आयुष्यात गुरूची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. बालपणापासूनच घरात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय स्वरूपाचे बाळकडू वडिलोपार्जित देण्यात आले. घरात आईने दिलेले संस्कार विचाराचा निर्माण केलेला भक्कम पाया, भावी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, सक्षम मन व दुर्गामी वैचारिकदृष्टी आईने दिलेल्या संस्कारातून मिळाले. आज सत्ताधारी पक्षाकडून काम करत असताना जनतेची सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. आईने दिलेल्या संस्कारामुळे रायगड जिल्ह्यावरती आलेल्या विविध संकटांचा सामना करताना बळ प्राप्त झाले. चक्रीवादळ, कोरोना , किंवा महाड मधील दुर्घटना असेल, प्रत्येक वेळी आई ने संस्कार रुपी दिलेले बळ पाठीशी उभे राहिले आहे. असे तटकरे यांनी म्हटले.

आज शिक्षण क्षेत्रातील चार दिग्गज व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे. प्रत्येक सत्कारमूर्ती ने आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित भावनेने कार्य केलेला आहे. शिक्षण क्षेत्राला समर्पित भावनेने काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून अभिनंदन करते त्यासोबत त्यांच्या आयुष्यातील एक टप्पा पूर्ण झालेला आहे मात्र दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करून समाजासाठी कार्य करतील याचा मला विश्वास आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहर शिक्षणाचे केंद्रबिंदू बनेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे. खासदार सुनील तटकरे भाऊ अनिकेत व मी श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा विकास व्हावा उच्चविद्याविभूषित तरुण वर्ग श्रीवर्धनमध्ये तयार व्हावा त्याला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा या सर्व बाबीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन ने मला सुखद धक्का दिलेला आहे. कमी वयामध्ये या स्वरूपाचा बहुमान मिळणे मी माझं भाग्य समजते. व्यक्तिमत्त्व विकासामध्ये गुरुजीची छत्रछाया लाभलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये निश्चितच यशस्वी स्वरूपाची कामगिरी बजावतो याची मला खात्री आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील गुरूचा सन्मान करणे अगत्याचे आणि आद्यकर्तव्य असतं. गुरु विना आयुष्याचा विकास होणे शक्य नाही. सरस्वती पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून अभिनंदन आहे असे राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
सदर सोहळ्याप्रसंगी श्रीवर्धन तालुक्या मधील निवृत्तशिक्षक आनंद जोशी, सुरेश मुद्राळे, नरहर बापट व शब्बीर खतीब यांना सरस्वती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, श्रीवर्धन चे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक गोखले कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास जोशी आदी उपस्थित होते.






Be First to Comment