जिंदगी एक सफर है सुहाना …
सिटी बेल लाईव्ह/ देशमुखगिरी…
जिंदगी एक सफर है सुहाना , यहा कल क्या होगा किसने जाना ‘ या अंदाज चित्रपटातील स्वर्गीय महंमद रफी यांनी गायलेल्या गीता प्रमाणे खरच आपले आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगताना आपल्या आयुष्यात उद्या काय होणार याची माहिती नसते. आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्या प्रामाणे बाईक चालवताना हेल्मेट आवश्यक आहे त्याप्रमाणे आज कोरोनामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अविभाज्य झाले आहे. आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे आपल्या आयुष्याचा शेवट होऊ नये यासाठी ‘ जिंदगी एक सफर है सुहाना , लेकीन मास्क लगाकर ही जाना ‘ म्हणावे लागत आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी घरी गणपतीसाठी जात असताना गाडीत मोबाईलवर मेसेज आला आपला राजेश गेला. माझी आणि त्याची ओळख तशी चार वर्षाची. राजेश निर्व्यसनी हसतमुख व्यक्तिमत्व , कोणतेही छोटे – मोठे काम करायला तयार, कोठे निघालो की गाडी चालवायला राजेशच . आठवड्यापूर्वीच त्याचा कोरोंनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो स्वत: दवाखान्यात जाऊन दाखल झाला होता. माझ्या कंपनीतील पॉझिटिव्ह झालेले बरे होऊन आले आहेत त्यामुळे मला काही होणार नाही असा आशावाद त्याला होता. दोन दिवसांनी त्याची तब्येत बिघडली वेन्टिलेटरची गरज असल्याने मोठ्या हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आल्याचे समजल्याने त्याचा मोठा भाऊ योगेश जवळ चौकशी केली तेव्हा ही असे वाटले नव्हते असे काही घडेल. ‘ यहा कल क्या होगा किसने जाना ‘चा प्रत्येय आला.
आज जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात कोरोंना झपाट्याने पसरत आहे. देशात लॉक डाऊन करून आज 5 महीने पूर्ण झाल्याने सरकार लॉक डाऊन उठवण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत.आपल्या राज्यात लाखो रुग्ण सापडलेत गुरुवारी एका दिवसात 80 हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडले. पण नागरिक डॉक्टरांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. कोरोनावर अद्याप लस सापडलेली नसल्याने ज्यांना इतर आजार पूर्वीपासून आहेत त्यांना जास्त धोका असल्याचे दिसून आले आहे . त्यासाठी काळजी घेणे बाहेर जाताना मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
आज समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने माणूस सुशिक्षित झाला असे आपण म्हणतो पण खरच तो सुशिक्षित झाला आहे का? तरूणांना मोठी पॅकेज मिळत असल्याने प्रत्येका जवळ दुचाकी किवा चारचाकी गाडी असते. शनिवार – रविवार वीक एंडला बाहेर जाणे हॉटेल मध्ये जाणे प्रतिष्ठेचे झाले आहे. शहराच्या बाहेर पडल्यावर वाहतुकीचे कोणतेही नियम ही तरूणाई पाळत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात घडतात. कोरोंनाच्या बाबतीत ही अनेक तरूण बेफिकिरीने वागत आहेत. मास्क न लावणे , सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, बाहेरून आल्यावर हात धुणे या गोष्टी टाळण्याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. त्यामूळे आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक निष्पाप आपले जीव गमावित आहेत. मोठी पॅकेज असल्याने हेल्थ इन्शुरन्स असतो त्यामुळे खाजगी रुग्णालयाची लाखो रुपये बिल भरणे अवघड नसेल ही पण गेलेला जीव परत येणार नाही याची जाणीव ठेवणे ही गरजेचे आहे. त्यासाठी जिंदगी एक सफर है सुहाना , लेकीन मास्क लगाकर ही जाना…हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे
Be First to Comment