सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरीच राहून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. परंतु त्यातून मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग १३ वर्षीय वरद गावंड या मुलाने करीत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या ५० स्वातंत्र्य सैनिकांची चित्रे रेखाटली आहेत.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन गावातील वरद गावंड या १३ वर्षीय विद्यार्थ्याने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळात ५० स्वातंत्र्य सैनिकांची चित्र रेखाटली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ज्या महापुरुषांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं त्या महापुरुषांचा आज विसर पडत चालला आहे. मात्र वरद गावंड या मुलाने ही चित्रे रेखाटून सर्वांनाच स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींचा उजाळा करून दिला आहे.

३ सप्टेंबर हा वरदचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने ही चित्रे आता इतरांना दाखवण्यासाठी आणि या थोर व्यक्तींची उजळणी करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.
चित्र रेखाटण्यास सुरुवात केली तेव्हा वरदने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने चित्र काढण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे वरदची ही चित्र रेखाटण्याची मोहीम ५० स्वातंत्र्य सैनिकांची चित्र रेखाटल्या नंतरच थांबली. अशा प्रकारे वरदने लॉकडाऊन मधून मिळालेला वेळ कशा प्रकारे मार्गी लावावा हे दाखवून दिले आहे. वरद प्रमाणे इतर मुलांनी अनुकरण करण्याची गरज आहे. यामुळे मुलांचा वेळ सत्कारणी लागेल असे पालक वर्गात बोलले जाते.







Be First to Comment