सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔶🔷🔶🔷
पाच महिन्यांपासून सुरू असलेले लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे माथेरान या पर्यटनस्थळावर पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या मिनिट्रेनची सफर येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिलेले असून याबाबत फोनद्वारे सविस्तरपणे चर्चा केली आहे.

भारतामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते यामध्ये रेल्वे वाहतुकीवर सुध्दा बंदी घालण्यात आली होती ही बंदी आतालॉक डाऊन शिथील झाल्यामुळे उठविण्यात आली आहे.माथेरान हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात त्यामुळे सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. इथे येणारे पर्यटक हे खासकरून इथल्या मिनिट्रेनच्या सफरीचाआनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात. ही ट्रेन खऱ्या अर्थाने पर्यटनाच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
माथेरान मध्ये येणारे पर्यटक हे दस्तुरी नाक्यापर्यंत मोटर वाहनाने येतात व दस्तुरी नाका ते माथेरान हे तीन किलोमीटर अंतर त्यांना पायी चालत जावे लागते.माथेरान मध्ये नेरळ ते माथेरान अशी मिनिट्रेन ही मालवाहतुकीच्या आणि पर्यटकांची ने आण करण्यासाठी आहे. सध्या इथे पर्यटकांना प्रवेश देण्यात आलेला आहे. याकामी नेरळ ते माथेरानआणि अमन लॉज रेल्वे स्टेशन ते माथेरान रेल्वे स्टेशन अशी शटल सेवा सुरू करावी यामध्ये रेल्वे विभागाला आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल मिनिट्रेन सेवा सुरू झाल्यास इथल्या पर्यटनाला चालना मिळून सर्वाना आर्थिक उत्पन्नास हातभार लागेल. या आशयाचे निवेदन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी खासदार बारणे यांना सादर केले असून लवकरच ही सेवा सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.






Be First to Comment