गणपती बाप्पा आले आणि चालले देखील. हा अकरा दिवसाचा काळ कसा संपला हे कळालेच नाही. बाप्पा, यंदा एक चांगली गोष्ट जाणवली ती म्हणजे, कोरोनामुळे यावर्षी तुझी मनोभावे पूजा करता आली. दरवर्षी तुझ्या नावाने भक्त मंडळीकडून वर्गणी गोळा करून जो उघड धिंगाणा घातला जात होता, तो यावर्षी दिसला नाही. किती शांतता आणि समृद्धता वाटत होती. गल्लोगल्ली कितीतरी गणपती मंडळ या काळात क्रियाशील होत होते. पोलिसांनी कितीही कायदे दाखविले तरी ही मंडळी कोणाचे ऐकत नव्हते. खूप मोठा आवाज ठेवून सर्वाना हादरवून सोडत होते. पण या कोरोनाने सर्वाना जगणे शिकवून टाकले. मनात श्रद्धा ठेवून भक्ती केली की देव प्रसन्न होते. त्यासाठी दुसरे काही करायची आवश्यकता नाही. मूर्तीची उंची किती मोठी असावी ? याची जाण देखील यानिमित्ताने झाली. सर्वच धर्मियांचे सण आपापल्या घरात साजरे होत आहेत, त्यामुळे कुठे काही वाद किंवा भांडण असे काही प्रकार दिसत नाहीत. राहता राहिले लोकांच्या रोजगाराचा प्रश्न. कोरोनामुळे गणपती उत्सवात ज्यांची खूप मोठी उलाढाल होणार होती ती झाली नाही. त्यामुळे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण देव बाप्पा ही समस्या सोडवतील. संकटाचे हे ही दिवस लवकरच संपून जावो आणि अच्छे दिन लवकरच येवो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी अर्पण करू या. हे गणराया, जगांवरील कोरोनाचे हे संकट लवकर दूर करून सर्वाना सुखी ठेव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना
- नागोराव सा. येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद


Be First to Comment