पाणी उकळून प्या : डॉक्टरांचा सल्ला ###
सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) पहिला पाऊस पडला की माती पाण्याबरोबर वाहून येते. मात्र हे मातीमिश्रित पाणी आजार वाढवणारे आणि आरोग्यासाठी घातकच ठरतात. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पाणी उकळून अथवा किमान फिल्टर करून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यासाठी शासन आणि प्रशासनाने जनजागृती करतानाच नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीने संसर्गजन्य आजार किती घातक ठरू शकतो हे दाखवुन दिले आहे. सर्व अर्थव्यवस्था ठप्प असून मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाळा सुरू झाला असून कोरोनाप्रमाणेच इतर संसर्गजन्य आजार आव्हानात्मक ठरु शकतात. पावसाळ्यात क्षुल्लक वाटणारे आजारही डोकं वर काढतात. पहिला पाऊस झाला की नदीला मातीमिश्रित गढूळ पाणी येते. त्यातच कोंदट वातावरणाने हे आजार बळावतात. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर मार्गदर्शनात्मक उपक्रम राबविले जातात. तसेच पावसाळ्यात आरोग्य कसे राखावे, याबाबत माहिती आणि मदत दिली जाते. मात्र नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करण्याची सरकारी यंत्रणेची अपेक्षा असते.
डासांमुळे आजारांचा प्रादुर्भाव
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. त्यातच त्यांच्यासाठी पोषक असलेल्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार वाढतात. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांचा समावेश होतो. तर, दूषित पाण्यामुळे डायरिया, कॉलरा, हेपेटीटीस, गॅस्ट्रो, आदी आजार पसरू शकतात.
पावसाळ्याच्या सुरुवातीला गढूळ पाण्यामुळे पोटदुखी, उलटी आणि जुलाब असे आजार पसरतात. तसेच सर्दी-तापाचा संसर्ग सुरू होतो. हे निर्माण झालेले आजार
जीवघेणे ठरू नयेत यासाठी प्रशासनाने डासनाशक फवारणी, पाणी साठवलेल्या ठिकाणी क्लोरिनचा वापर करावा, तर नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे किंवा शक्यतो फिल्टर करून प्यावे. यामुळे आजार होत नाहीत; किंबहुना झाले तरी नियंत्रणात राहतात.
- डॉ. के. वाय. मोहिते, फॅमिली फिजिशियन, उकरुळ-कर्जत
Be First to Comment