Press "Enter" to skip to content

महिला सुरक्षेचा बुलंद आवाज; सभापती ममता प्रितम म्हात्रे यांच्या विशेष सहभागाने रंगली ‘ऑरेंज द वर्ल्ड’ रॅली

शिवकालीन महिला स्वसंरक्षणाच्या प्रात्यक्षिकांनी वेधले उपस्थितांचे लक्ष; महिला व सुरक्षारक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल, दि. २८ नोव्हेंबर २०२६ : महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी तसेच महिला सुरक्षा व स्वसंरक्षणाबाबत समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानांतर्गत पनवेल शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

इनर व्हील क्लब ऑफ पनवेल सिटी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी, इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल, पनवेल महानगरपालिका, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि पनवेल शहर पोलीस यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.

पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी या उपक्रमात विशेष सहभाग घेत महिला सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला. पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुभाष पुजारी यांनी या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.

वडाळे तलाव येथून सुरू झालेल्या दुचाकी रॅलीच्या माध्यमातून पनवेल शहरातील विविध भागांत महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये महिला वर्गासह पोलीस आणि पनवेल महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली शिवकालीन युद्धकला व महिला स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके. बाल कलाकारांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. महिलांमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रात्यक्षिकांचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

महिलांची सुरक्षितता ही केवळ महिलांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. प्रत्येक महिलेला निर्भयपणे आणि सन्मानाने जगता आले पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आज समाजातील विविध घटक एकत्र आले, ही अभिमानास्पद बाब आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकवर्गाचा, सुरक्षारक्षकांचा आणि सर्व सहभागींचा मला मनापासून अभिमान आहे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी यापुढेही विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

– सौ. ममता प्रितम म्हात्रे
सभापती, महिला व बालकल्याण समिती,
पनवेल महानगरपालिका.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.