

उलवे, ता. २८ : कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली ती केवळ फक्त मुलांनी शिकावे, साहेबी पोशाख परिधान करावा आणि आपल्या लोकांना, आपल्या भूमीला विसरावे यासाठी नाही. तर त्यांनी शिक्षण तर घ्यावेच, पण त्यासोबतच आपण समाजाचे काही देणे लागतो, ज्या संस्थेने आपल्याला शिकवले, ज्या गावाने, आई-वडिलांनी आपल्याला पुढे नेले त्यांचेही आपण काही देणे लागतो. याचे भान ठेवून त्या विद्यार्थ्यांने सामाजिक काम सुद्धा केले पाहिजे. माणूस घडवण्याचे शिक्षण अण्णांनी दिले. त्यातूनच घडलेले रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी एक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडली. ती संकल्पना अशी होती की, गेल्या वर्षी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून पुढील वर्षभरात रयत शिक्षण संस्थेच्या शाळा कॉलेजमध्ये ‘कर्मवीर भाऊराव पाटील जीवन चरित्र आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान’ या विषयावर शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालयांत जाऊन व्याख्याने द्यायला हवीत. त्या संकल्पनेचा शुभारंभ गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, ज्या ठिकाणी रामशेठ ठाकूर यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. तेथे शुक्रवारी (ता. २७) झाला. महेंद्रशेठ घरत यांची संकल्पना उदात्त आहे. त्यामुळे सगळ्यांना ती भावली आणि सगळ्यांनी त्या संकल्पनेचे कौतुक केले.

या व्याख्यानमालेत बोलताना शिवव्याख्याते प्रशांत देशमुख पुढे म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था ही आजघडीला आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. कर्मवीरांच्या कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थ्यांना आपोआपच सामाजिक समतेचे शिक्षण मिळाले. कारण अठरापगड जातीची मुले एकत्र काम करत होती, एकत्र शिक्षण घेत होती, एकत्र जेवण करत होती. त्यामुळे जात-पात-धर्म विसरून त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी प्रेम, आदरभाव, वात्सल्य आपोआपच निर्माण झाले. ते वेगळे शिकवावे लागले नाही. कर्मवीर अण्णांनी दिलेल्या शिक्षणाची ताकद इतकी मोठी होती की, त्याच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘कमवा आणि शिका’ योजनेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आपल्या उद्योग-व्यवसायात इतकी प्रगती करतो, की त्यानंतर आपल्या रयत शिक्षण संस्थेला न विसरता कोट्यवधी रुपयाची देणगी ‘रयत’ साठी देतो आणि कृतज्ञता म्हणून त्या विद्यार्थ्याच्या नावाने साताऱ्यामध्ये भवन उभे राहत. ते भवन म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन. आणि तो विद्यार्थी म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर! आतापर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांची देणगी ‘रयत’ला दिली आहे. ‘रयत’च्या पहिल्या १२ विद्यार्थ्यांनी ‘रयत’ला वाहून घेण्याची शपथ घेतली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत, दुसरी शपथ घेतली तेहा कर्मवीर हयात नव्हते. मात्र मनोमनी रयतला वाहून घेण्याची शपथ घेतली रामशेठ ठाकूर यांनी आणि आज ते प्रत्यक्षात कृती करतायत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळाही सुसज्ज होत आहेत.” असे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख गव्हाण-कोपरच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पहिले पुष्प गुंफताना ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर होते. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, वाय. टी. देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशांत देशमुख पुढे म्हणाले, “शरद पवार साहेब आजही म्हणतात की पैसे कमावता येतात; परंतु त्याचा सदुपयोग समाजासाठी कसा करायचा याचा आदर्श रामशेठ ठाकूर यांनी घालून दिला आहे. पंढरीच्या वारकऱ्यांना जसा पंढरीला गेल्यानंतर आनंद होतो. त्याचप्रमाणे सातारा आणि तेथील धनिनीची बाग ही रामशेठ ठाकूर साहेबांसाठी पंढरी आहे. नऊ मे ची सातारची वारी ते कधी चुकवीत नाहीत, तिथे जाऊन त्यांच्या विठ्ठलाला भेटतात. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि नवचैतन्य घेऊन पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी सज्ज होतात.”
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “शिवव्याख्याते प्रशांत देशमुख हे कर्मवीरांचे जीवन हुबेहूब अतिशय चपखलपणे सादर करतात. त्यांच्यातील वक्तृत्व आपणा सर्वांस प्रेरणादायी आहे. त्यामुळे महेंद्रच्या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे. महेंद्रशेठ घरत यांच्याविषयी माझ्याकडे कोणी काय बोलते, हा विचार मी करत नाही. आमचे नाते अतूट आहे.”
यावेळी प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, जिज्ञासा कोळी आणि मान्यवर, तसेच अनेक विद्यालयांचे शिक्षक वृंद उपस्थित होते.


Be First to Comment