
आता अधिकाऱ्यांनाच दूषीत पाणी पाजण्याचा इशारा ! भूसार मोहल्ल्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप; जलवाहिनी बदलण्यासाठी ठाकरे सेनेचा आक्रमक पवित्रा
पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : नळातून पाणी नव्हे, तर गटारमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा गंभीर आरोप भूसार मोहल्ला, साई पार्क आणि जैन मंदिरामागील परिसरातील नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. आता जलवाहिनी तातडीने न बदलल्यास नळातून येणारे दूषित पाणी संबंधित अधिकाऱ्यांनाच पाजण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रविण जाधव आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
नळ सुरू केल्यानंतर सुरुवातीला घाण पाणी येते आणि त्याला गटाराचा उग्र वास येतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. परिसरातील अनेक नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. स्थानिक महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांचीही प्रकृती बिघडल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका आर्या जाधव यांनी १६ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. परिसरातील जुनी व जीर्ण झालेली पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी बदलून नवीन वाहिनी टाकण्याची मागणी त्यांनी केली होती. अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करूनही त्याचा उलगडा झालेला नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सोमवारी जलवाहिनी बदलण्याचे आश्वासन मिळाल्याचे प्रविण जाधव यांनी सांगितले. मात्र, आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर दूषित पाणी अधिकाऱ्यांसमोर आणून त्यांनाच पाजले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी मागणी परिसरातून होत आहे.


Be First to Comment