
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रोत्साहन; प्राचार्या डॉ. सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थ्यांचा सहभाग
पनवेल (प्रतिनिधी ) नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लॉ येथे आयोजित ‘इंटरनॅशनल लॉ स्कूल मिडिएशन टूर्नामेंट २०२६’ या INADR आंतरराष्ट्रीय मध्यस्थी स्पर्धेत पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नंदिता मोरे, सुदिप घोलप आणि सिद्धेश गावकर यांनी महाविद्यालयातर्फे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कॉलेजची उपस्थिती नोंदवली.
संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रोत्साहन आणि प्राचार्या डॉ. सानवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कायद्याच्या अभ्यासाला संवाद, वाटाघाटी आणि सामंजस्यातून वाद सोडविण्याच्या व्यावहारिक प्रक्रियेची जोड देणारा हा सहभाग ठरला. या स्पर्धेत मध्यस्थीविषयक राष्ट्रीय परिसंवाद, तज्ज्ञांचे प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक फेऱ्यांचा समावेश करण्यात आला. न्यायालयात जाण्यापूर्वीची अनिवार्य मध्यस्थी, विविध देशांतील दृष्टिकोन, तसेच मध्यस्थीतील पक्षप्रतिनिधित्वाची तयारी, रणनीती आणि नैतिकता हे परिसंवादाचे प्रमुख विषय होते.
तर, सहभागी संघांसाठी INADR व्यावसायिक आणि पर्यायी विवाद निवारण क्षेत्रातील तज्ज्ञांचे प्रशिक्षण नियोजित करण्यात आले. स्पर्धेची रचना तीन प्राथमिक फेऱ्या, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशा स्वरूपाची होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मध्यस्थी प्रक्रियेतील विविध भूमिकांचा अभ्यास करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.
मध्यस्थीमध्ये पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या गरजा ओळखणे आणि दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह पर्याय शोधणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कायदेशीर ज्ञानासोबत सक्रिय श्रवण, संयम, तटस्थता आणि प्रभावी संवाद आवश्यक असतो. अशा स्पर्धांतील सहभाग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जडणघडणीला दिशा देतो.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे संस्थात्मक पाठबळ आणि डॉ. सानवी देशमुख यांचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभलेल्या या तिन्ही विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे बीसीटी लॉ कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा अनुभव त्यांच्या पुढील विधी शिक्षणासाठी आणि व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.


Be First to Comment