
कुंडलिका नदी बचावासाठी अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू होते आंदोलन; खासदारांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषणाची सांगता
रोहा :प्रतिनिधी
कुंडलिका नदीचे संरक्षण आणि नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवत सामाजिक कार्यकर्ते मंगेश रावकर यांनी २५ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या उपोषणाची आज सांगता झाली. रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मंगेश रावकर यांनी खासदारांच्या हस्ते पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.
कुंडलिका नदी ही रोहा परिसराची जीवनवाहिनी असून तिचे नैसर्गिक अस्तित्व आणि पर्यावरणाचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नदीपात्रात तसेच नदीच्या परिसरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, नदीचे संवर्धन व्हावे आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा पोहोचू नये, या प्रमुख मागण्यांसाठी मंगेश रावकर यांनी उपोषण सुरू केले होते.

२५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी आज उपोषणस्थळी उपस्थित राहून मंगेश रावकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर खासदारांच्या हस्ते पाणी घेऊन रावकर यांनी उपोषणाची सांगता केली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष अॅड. मनोजकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार खरीवले, हर्षल साळवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुंडलिका नदीचे संरक्षण, नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आणि पर्यावरण संवर्धनाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाची खासदारांच्या आश्वासनानंतर सांगता झाली. मात्र, कुंडलिका नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि नदीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त होत आहे.
नदीचे संवर्धन ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. कुंडलिका नदीच्या संरक्षणासाठी मंगेश रावकर यांनी केलेल्या आंदोलनातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश अधोरेखित झाला आहे.


Be First to Comment